संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 20 बैठका तर दोन्ही सभागृहांत एकूण 105 तास काम चालले आणि गोंधळ-गदारोळातच आज अधिवेशनाचे सूप वाजले. लोकसभेत 57.87 टक्के कामकाज झाले तर राज्यसभेत 41 टक्के कामकाज झाले. सभागृहात एकूण चार विधेयके सादर करण्यात आली, परंतु कुठलेही विधेयक मंजूर होऊ शकले नाही. तर ‘एक देश, एक निवडणूक’ या विधेयकाची सर्वाधिक चर्चा झाली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली तेव्हा अदानी लाचखोरी प्रकरण विरोधकांनी लावून धरले. त्यामुळे पहिल्या आठवड्यात कामकाज होऊ शकले नाही. दुसऱ्या आठवड्यात अदानीचा मुद्दा खोडून काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरेसचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे दुसरा आठवडाही गोंधळातच गेला. तिसऱ्या आठवड्यात मणिपूर आणि संभलच्या मुद्द्यावरून वाद झाला. तर अखेरच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अनुद्गारामुळे विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. या मुद्द्यावरून संसद परिसरात आंदोलने झाली.
10 डिसेंबर रोजी सत्ताधारी आणि विरोधक संसदेच्या मकर दरवाजाजवळ भिडले. विरोधकांनी ‘जय भीम’चा नारा देत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले. याप्रकरणी भाजप खासदारांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला तर काँग्रेसनेही भाजप खासदारांविरोधात तक्रार दाखल केली.
अखेरच्या दिवशीही गोंधळच
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही गोंधळाची मालिका कायम राहिली. आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. ‘जय भीम’च्या घोषणाही देण्यात आल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे अखेर लोकसभा अध्यक्षांनी कामकाज संपल्याचे घोषित केले. राष्ट्रगीतानंतर लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, राज्यसभेतही विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले.
काही आवश्यक संसदीय कामकाज वगळले तर या अधिवेशनात संसदेत योग्यरीत्या कामकाज होऊ शकले नाही. भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संयुक्त संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी दोन्ही सभागृहांत चर्चा झाली. त्याचा अपवाद वगळला तर हे अधिवेशन गोंधळ, घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपातच पार पडले.