उष्णता वाढल्याने आठवडे बाजारात शुकशुकाट

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बुधवारी दुपारी तापमानाचा पारा 40 अंशावर गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. महिनाभरापासून दर बुधवारी तीन वाजता सुरू होणारा आठवडे बाजार उन्हाच्या कडाक्यामुळे संध्याकाळी पाचच्या पुढे उशिरा भरत असल्याने व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारात असतात.

नीरा येथील आठवडे बाजारात परिसरातील खेड्यापाड्यातून नागरिक खरेदीसाठी येतात. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होते. भाजीपाला, शेतीशी निगडित साहित्य, घरगुती वस्तू, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल, कपडे यांसह अन्य गोष्टींची दुकाने, छोटे व्यापारी या आठवडे बाजारात थाटतात. मात्र, यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम आठवडे बाजारावर होत असून, व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

सायंकाळी ऊन उतरल्यानंतर पाच ते सहा वाजण्याच्या पुढे ग्राहकांची बाजारात प्रचंड गर्दी होते. रात्री सात वाजण्याच्यापुढे दुकान आवरून घरी जाण्याची लगबग सुरू असते. त्यामुळे मिळेल त्या किमतीला भाजीपाला किंवा इतर मालाची विक्री करण्याची वेळ येत असल्याने काही वेळा आर्थिक फटका सहन करावा लागतो, अशी व्यथा छोट्या व्यावसायिकांनी मांडली. दुपारी बारानंतर उन्हाचा चटका वाढत असल्याने ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. अनेक वेळा ग्राहक नसल्याने उन्हात बसून राहण्याची वेळ छोट्या व्यावसायिकांवर येते.