उरुळीकांचन ग्रामस्थांनी रोखली तुकोबांची पालखी; मार्ग बदलल्याने संतप्त प्रतिक्रिया

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराजांची पालखी कदमवाकवस्ती येथील मुक्कामानंतर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उरुळीकांचन येथील एलाईट चौकात पोहचली. परंतु पालखी सोहळा विश्वस्तांनी यंदा मार्गात बदल केल्यामुळे रथापुढील नगाऱयाचा बैलगाडा ग्रामस्थांनी रोखला. या वेळी ग्रामस्थ आणि पालखी सोहळा विश्वस्तांमध्ये वादावादी झाली. पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली. त्यांनतर पालखी सोहळा यवत मुक्कामी मार्गस्थ झाला.

परंपरेनुसार दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी उरुळीकांचन गावात प्रवेश करताना आश्रम रोड मार्गे तळवाडी चौकातून गावाला प्रदक्षिणा घालून पुढे यवतला मार्गस्थ होते. तसेच उरुळीकांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील प्रांगणात दोन तासांच्या विसाव्यासाठी थांबते. या वेळी दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. ग्रामपंचायतीकडून वारकऱयांसाठी विविध सोयीसुविधांची तयारी केली होती. मात्र या वर्षी विश्वस्तांनी केलेल्या बदलामुळे तासन्तास रांगेत उभे राहून दर्शनासाठी व्याकूळ झालेल्या वैष्णव भक्तांना निराशेला सामोरे जावे लागले. दुपारचा विसावा उरुळीकांचन येथे न घेता ढगे मळा येथे घेण्यात आला. त्यामुळे या निर्णयाला उरुळीकांचन येथील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी थेट पालखी अडवत आपला विरोध व्यक्त केला. दरवर्षी ज्या मार्गाने पालखी जाते, त्याच मार्गाने पालखी नेण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.

विश्वस्त आणि ग्रामस्थांमध्ये वाद…
पालखी मार्ग बदलण्याचा निर्णय विश्वस्तांच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय गावकऱयांना मान्य झाला नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नियोजित मार्गानेच पालखी नेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पालखी मार्गावर दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे मार्ग न बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. या दरम्यान, पालखीचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक वाद झाला.