दापोलीत भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांचा अतिउत्साह नडला; पर्यटकांची गाडी समुद्रात बुडाली

दापोलीतील कर्दे येथील समुद्र किनाऱ्यावर भटकंतीसाठी आलेल्या पुणे येथील पर्यटकांचा आततायीपणा त्यांना चांगलाच नडला. फिरण्यासाठी कर्दे येथे आलेल्या पर्यटकांची गाडी समुद्रात बुडाली त्यामुळे त्यांना चांगलाच घाम फुटला.

दापोली येथील स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टीची भुरळ अनेकांना पडते. ज्यांना समुद्राचे दर्शन होत नाही असे लोक पर्यटनासाठी दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर येत असतात. तसे जोडून आलेल्या सुट्टयांमुळे दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात भटकंतीसाठी आले आहेत. मात्र पुणे येथून आलेल्या पर्यटकांना त्यांचा अतिउत्साह नडला. आणि ते घेऊन आलेली गाडी कर्दे येथील समुद्रात बुडाली.

पुणे येथील काही पर्यटक इनोव्हा गाडी घेऊन भटकंतीसाठी दापोली येथे आलेले होते. ते गुरूवारी कर्दे येथील समुद्र किनाऱ्यावर मौज मजा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले. स्वच्छ सुंदर सपाट समुद्र किनारपट्टी पाहून त्यांनी आणलेली इनोव्हा गाडी समुद्र किनाऱ्यावर नेली. समुद्र किनाऱ्यावर इनोव्हा गाडी नेत असताना येथील स्थानिकांनी त्यांना समुद्राच्या पाण्याला भरती आल्याची सुचना केली.  समुद्राचे आकर्षण असलेल्या या हौसी पर्यटकांनी उत्साहाच्या भरात त्याकडे कानाडोळा केला. आणि गाडी समुद्राच्या पाण्यात घातली आणि ते फसले. स्थानिक नागरिक हे सर्व बघत होते. अति उत्साहाचा पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी स्थानिकांकडे मदत मागितली. समुद्राच्या पाण्याला भरती आलेल्यामुळे मदत करणे शक्य नव्हते. अखेर दुस-या दिवशी शुक्रवारी सांयकाळी स्थानिकांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने समुद्राच्या पाण्यातील वाळूत अडकून राहिलेल्या युनोव्हा गाडीला बाहेर काढण्यात यश आले असले तरी मात्र इनोव्हा गाडीचे मोठेच नुकसान झाले आहे.