खेळांमधील निर्णयांना अचूकता यावी म्हणून तंत्रज्ञानाचे पूर्ण सहकार्य असतानाही तिसऱ्या पंचांनी बॅटची कड लागल्याचे टिपण्यासाठी लावल्या गेलेल्या स्निकोमीटरच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि यशस्वी जैसवालचा निर्णय देताना टेक्नॉलॉजीचीच विकेट काढली. स्निकोमीटरमध्ये चेंडू बॅट किंवा ग्लोव्हजला स्पर्श करून गेल्याची कोणतीही हालचाल दिसत नसतानाही केवळ चेंडू बॅटला चाटून गेल्याच्या अंदाजावरून यशस्वीला बाद ठरवण्याचा वादग्रस्त निर्णय दिला. या निर्णयानंतर प्रेक्षकच नव्हे तर क्रिकेटमधील दिग्गजांनीही तिसरे पंच सैकत शरफुद्दौलाच्या निर्णयावर जोरदार ताशेरे ओढले.
तिसऱ्या पंचांच्या या निर्णयाबाबत सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केली. मैदानी पंचांनी नाबाद ठरवलेल्या निर्णयाला बदलण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे ठोस पुरावे असावे लागतात. स्निकोमीटरमध्ये जे दिसत नव्हते ते पंचांना सामान्य व्हिडीओमध्ये दिसले. अशा स्थितीत तुम्ही तंत्रज्ञानाचा वापरच का करत आहात? जे व्हिडीओमध्ये दिसतेय ते भ्रमसुद्धा असू शकतो, असे म्हणत गावसकरांनी पंचांच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच रवी शास्त्री यांनी स्निकोमीटर ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज असल्याची टीका केली. जे स्निकोमध्ये दिसत नाही आणि आपण मैदानी पंचांनी नाबाद ठरवलेल्या निर्णयाला बाद ठरवता. असे क्रिकेटमध्ये क्वचितच घडले असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.
नेहमी फटका आम्हालाच बसतोय
नेहमी तंत्रज्ञानाशी संबंधित निकाल प्रकरणांचा फटका आमच्या संघालाच बसतोय. मला कळत नाहीय की नक्की याला काय म्हणावे. जिथे तंत्रज्ञानाने काहीही दाखवले नाही. मात्र डोळ्यांनी चेंडू बॅट किंवा ग्लोव्हजला लागून गेल्याचे दिसतेय. पंचांनी या तंत्राचा कसा वापर करायला हवा हे मी सांगू शकत नाही. पण त्यांच्याकडून निष्पक्ष निकालाची अपेक्षा आहे. आम्हालाही कल्पना आहे की, स्निकोमीटर शंभर टक्के अचूक नाही, पण आम्ही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. पण अशा तंत्रज्ञानाचा आम्हाला नेहमीच फटका बसतोय. आम्ही दुर्दैवी असल्याचेही कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.