सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवासस्थानी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. सरन्यायाधीशांच्या या कृतीवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. असे करणे म्हणजे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी तडजोड होत असल्याची टीका जेष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी केली आहे.
देशाच्या सरन्यायाधीशांनी कार्यकारी संस्था आणि न्यायपालिका संस्था यांच्यातील स्वतंत्र अधिकारांबाबत तडजोड केली आहे. सरन्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावरील विश्वास गमावला. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन ऑफ इंडिया (SCBA) ने सरन्याधीशांनी केलेल्या या तडजोडीचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह (Indira Jaising) यांनी केली आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांना त्यांनी X वर टॅग करत सरन्यायाधीशांचा निषेध करण्याची विनंती केली आहे.
कोण आहेत इंदिरा जयसिंह?
Chief Justice of India has compromised the separation of powers between the Executive and Judiciary. Lost all confidence in the independence of the CJI . The SCBA must condemn this publicly displayed compromise of Independence of the CJI from the Executive @KapilSibal https://t.co/UXoIxVxaJt
— Indira Jaising (@IJaising) September 11, 2024
इंदिरा जयसिंह या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत आणि विशेषत: मोठ्या खटल्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. 1986 मध्ये इंदिरा जयसिंह या मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या ज्येष्ठ वकील बनल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा देऊन केली. या मालिकेत दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळमधील काही महिलांना त्यांच्या मालमत्तेवर हक्क देण्यात आला होता. यासोबतच त्यांनी रुपन बजाज यांच्यासाठी कायदेशीर लढाईही लढवली. रुपन या त्याच महिला आयएएस अधिकारी आहेत ज्यांनी 1988 मध्ये पंजाबचे तत्कालीन डीजीपी केपीएस गिल यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. इंदिरा जयसिंग यांनी 17 वर्षे ही लढाई लढली आणि निर्णय रुपन यांच्या बाजूने लागला.
इंदिरा यांना 2009 मध्ये देशातील पहिल्या महिला अतिरिक्त सॉलिसिटर बनण्याचा बहुमान मिळाला होता.
तसेच वर्ष 2018 मध्ये, ‘फॉर्च्यून मॅगझिन’, या जगातील प्रसिद्ध मासिकांपैकी एक, हिंदुस्थानच्या प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंह यांचा जगातील टॉप 50 नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला.
इंदिरा जयसिंह एक नामांकित सामाजिक संस्था (एनजीओ) देखील चालवतात आणि त्या संस्थेचे नाव लॉयर्स कलेक्टिव आहे. अलीकडेच या संस्थेवर छापाही टाकण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांच्या एनजीओवर आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता.
लॉयर्स कलेक्टिव्ह एनजीओची स्थापना इंदिरा जयसिंह यांनी त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्यासोबत 1981 साली केली होती. ही एनजीओ महिलांच्या हक्कांसाठी लढते, यात कायदेशीर लढाईचाही समावेश आहे.
मुंबईतील एका सिंधी कुटुंबात जन्मलेल्या इंदिरा यांनी 1962 मध्ये बंगलोर विद्यापीठातून बीए आणि नंतर मुंबई विद्यापीठातून एलएमएल पदवी मिळवली होती.