सरकारने निवडणुकीच्या काळात लाडकी बहिण योजनेचे अनुदान वाढविण्याचे, शेतकर्यांच्या कर्जमाफीचे, महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर या निर्णयावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. फायद्यात असलेली एसटी तोट्यात आहे असे सांगून सत्ता येताच एसटीचे दर वाढविले. याविरोधात आता शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. कोण आले, कोण गेले याचा विचार करत बसण्यापेक्षा नांदेड जिल्ह्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी दानवे म्हणाले की, कुणाच्या जाण्यामुळे पक्ष संघटनेची ताकद कमी होत नसते. पक्ष संघटन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. स्वार्थासाठी पक्षात येतात, तिकीटे मिळवून निवडणूक लढवायची आणि निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्याचे खापर पक्षाच्या नेत्यावर फोडायचे, ही नांदेड जिल्ह्याची फॅशन झाली आहे. त्यावर चर्चा न करता त्याकडे दुर्लक्ष करा, एकेकाळी हा जिल्हा चार चार आमदार निवडणून देणारा होता, जिल्हा परिषदेवर, महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला, विधानसभेतील निवडणुकीतील अपयशानंतर खचून न जाता येणार्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी गावपातळीवर नियोजन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणुकीच्या काळात जनतेला आमिष दाखवून लाडकी बहिण योजना, अनुदान वाढविणे, कर्जमाफी करणे, आदी घोषणा सरकारने केल्या. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. एसटीच्या दरात भरमसाठ वाढ झाली, प्रवाशी भाडे वाढले, फायद्यात असलेली एसटी तीन महिन्यात कशी तोट्यात आली असा सवाल करुन येत्या 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सर्व बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, लोहा-कंधारमध्ये निष्ठावंत शिवसैनिक आजही पक्षासोबत असल्याचे बैठकीत दिसून आले. काही मंडळी पक्षात येतात आणि जातात, त्यामुळे पक्षावर काही फरक पडणार नाही, येणार्या काळात शिवसेनेचा नांदेड जिल्हा हा बालेकिल्ला आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दाखवून देऊ, शिवसैनिकाची नावनोंदणी मोठ्या प्रमाणात करुन जनतेत मिसळण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तिन्ही जिल्हाप्रमुखांनी आपल्या कामाचा आढावा घेतला. शिवसैनिकांची मतेही दानवे यांनी जाणून घेतली.
या बैठकीस शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, बबनराव बारसे, ज्योतिबा खराटे, सहसंपर्कप्रमुख दत्ता कोकाटे, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, एसटी कामगार सेनेचे विभागीय सल्लागार प्रकाश मारावार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.