विशाळगडावरील हिंसाचाराला राज्य सरकारच जबाबदार; संभाजीराजे छत्रपती यांनी ठणकावले

ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला रविवारी लागलेल्या हिंसक वळणाचे आपण समर्थन करत नाही. पण हे का घडले, याचे कारण शोधले पाहिजे. याला सर्वस्वी प्रशासन आणि राज्य सरकारच जबाबदार आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी ठणकावले. दरम्यान, आयुष्यभर शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी राहून जे पुरोगामित्व सोडून महायुतीसोबत गेले; तसेच यासीन भटकळसारखा अतिरेकी जर सात-आठ दिवस विशाळगडावर राहून जात असेल तर पालकमंत्र्यांनी आपल्याला पुरोगामित्व शिकवू नये. दीड वर्ष गडावरील अतिक्रमणे हटविली नाहीत. त्यावेळी तुमचा पुरोगामीपणा कोठे गेला होता. माझा जन्मच छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यात झाला आहे. त्यामुळे तुमचे पुरोगामित्व काय आहे, याचे आत्मचिंतन करा, अशा शब्दांत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खडे बोल सुनावले.

पत्रकार परिषदेत संभाजीराजे बोलत होते. अनेक संघटना विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावे, यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. गडावरील अतिक्रमणे कोणा एकटय़ाची नसून, दोन्ही समाजांची आहेत. शिवाय हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असताना सरकारनेसुद्धा तिथे अतिक्रमण केले आहे. शासकीय पाहणीत विशाळगडावर तब्बल 158 अतिक्रमणे झाल्याची नोंद आहे. स्थानिकांनीही ते मान्य केले आहे. गडाखालील कल्पेश पाटील ही एकच व्यक्ती न्यायालयात गेली असताना, मग बाकीचे अतिक्रमण का काढले नाही? आपण गेलो म्हणून निर्णय घेऊ शकता, तर मग दीड वर्ष झाले निर्णय का घेतला नाही? शिवभक्तांचा आक्रोश होता, आपण तिथे जाणार हे माहीत असूनही प्रशासनाने बंदोबस्त का लावला नाही? आधीच निर्णय का दिला नाही? पालकमंत्र्यांनी पुढाकार का घेतला नाही? विशाळगडावरील प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांना कोणी सांगितले, असे अनेक सवालही संभाजीराजे यांनी उपस्थित केले.

विशाळगडावर दंगल घडण्याची शक्यता असल्याचे मुस्लिम समाजाने जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. मग प्रशासनाने यंत्रणा का लावली नाही? त्यांना दंगल हवी होती काय, प्रशासनाने याचे संशोधन करायला हवे. गजापुरात घडलेल्या घटनेचे आपण समर्थन करत नाही. प्रशासनाने त्याचा तपास करावा. यामध्ये पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. माझ्यावर जर गुन्हा दाखल केला असेल तर आपण आताच शाहूवाडी पोलीस ठाण्यात जातो. माझे वडील लोकसभेला उभे होते म्हणून मी त्यांचा प्रचार केला. मी कोणत्याही आघाडीत नाही. मी युतीतसुद्धा नाही. जर सरकारने माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून हे केले असेल तर मी ते तपासेन, असेही संभाजीराजे यांनी बैठकीत सांगितले. आपले पर्यटक दुसऱया राज्यांतील किल्ले पाहायला जातात. मग आपले किल्ले ते का पाहत नाहीत, अशी खंत व्यक्त करून किल्ल्यावरील अतिक्रमणाला सरकार जबाबदार असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.

दोषींवर त्वरित कारवाई करा, मुस्लिम बोर्डिंगचे निवेदन

विशाळगडावर काल झालेल्या प्रकाराने जिह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. यातील समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे तसेच त्यांच्या स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आणि दंगलीचे सूत्रधार असलेल्या पुण्याचे रवींद पडवळ यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी मुस्लिम बार्ंडगकडून करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले. तसेच दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही तर धरणे आणि विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच अतिक्रमणांविषयी जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवावी. त्याचप्रमाणे गजापूर, मुसलमानवाडी येथे पोलिसांनी सुरक्षा दिली नाही. फक्त बघ्याची भूमिका घेतली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम बार्ंडगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, जाफर मुजावर, कैश बागवान उपस्थित होते.

गडकोट, किल्ल्यांना किती निधी दिला?

गडकोट, किल्ल्यांसदर्भात पहिल्यापासून आपली भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याचे राजकीय श्रेय आपण आजपर्यंत कधीही घेतलेले नाही. दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण साजरी करण्यात पुढाकार घेतला. रायगडसह अन्य किल्ल्यांना संवर्धनासाठी भरघोस निधी आणला. तरीसुद्धा जर आपल्यावरच टीका होत असेल तर आत्तापर्यंत किती पुढारी आणि नेत्यांनी गडकोट, किल्ल्यांसाठी निधी आणला, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.