रायगडातील सरपंच, ग्रामसेवक गावच्या विकासाची ब्लू प्रिंट बनवणार

रायगड जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवक आता गावच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार आहेत. गावाचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या योजना राबवाव्यात याबाबत जिल्ह्यातील सर्वच सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम म्हसळा येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पार पडला.

ग्रामपंचायत हद्दीतील गावखेड्यांमध्ये विकासकामांचे आराखडे तयार करताना ग्रामसभांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असतो. गावात पायाभूत सुविधांची निर्मिती करताना स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी या सर्व घटकांचा विचार करून दुर्बल व वंचित घटकांना प्राधान्यक्रम देणे महत्त्वाचे असते . त्याचबरोबर गरिबीमुक्त गाव,आरोग्यदायी गाव, बाळस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभूत सुविधा असलेले स्वयंपूर्ण गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव अशा एकूण नऊ संकल्पनांचा विचार करण्याबाबत या कार्यक्रमात सरपंच आणि ग्रामसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदचे अलिबाग विस्तार अधिकारी हंसराज कोकर्डे, अलिबाग लेखापाल प्रथमेश राणे, म्हसळा पंचायत समिती विस्तार अधिकारी डी. एन. दिघीकर, विस्तार अधिकारी परशुराम पाटील, प्रशासन अधिकारी हेमंत माळी, यशदा राज्य प्रशिक्षक मृण्मयी शेंबेकर, यशदा प्रशिक्षक किशोर शिताळे आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन महत्त्वाचे

गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम आशासेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शेतकरी व शेती संबंधित घटकांची मदत घेतली तर त्याचा चांगला फायदा होणार आहे. शिक्षक, बँकर्स, शासकीय विभाग आणि यंत्रणा, ग्रामरोजगार सेवक, सामाजिक कार्यकर्ते, पालक शिक्षक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, स्वयंसहाय्यता बचत गट, खासगी क्षेत्र, बिगर सरकारी संस्था व समूह संघटना संस्था, स्थानिक तज्ज्ञ व्यक्ती या सर्व घटकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरणार आहे. याकडे सरपंच आणि ग्रामसेवकांनी विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचा सल्लाही यावेळी तज्ज्ञांनी दिला.