देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बोगस आंबा विक्रीला पायबंद बसणार! हापूस आंबे सहज ओळखता येणार

देवगडचा जगप्रसिद्ध हापूस आंबा हा सगळ्यांनाच भूरळ पाडतो. या आंब्याची ख्याती सर्वदूर पसरल्याने त्याला प्रचंड मागणी आहे. देवगड हापूस आंब्याच्या उत्तम गुणवत्तेमुळे बाजारात त्याला जास्त भाव मिळतो आणि याच गोष्टीचा गैरफायदा अनेक व्यापारी घेतात. हापूसच्या नावाखाली अनेकदा बोगस आंब्यांची विक्री होते. त्यामुळे देवगडमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसतो. आंबा बागेची मशागत करण्यासाठी शेतकऱ्याला प्रचंड खर्च येत असतो. अनेक संकटांवर मात करत शेतकरी हापूस आंबा बाजारपेठेत विक्री करत असतो.

देवगड हापूस आंबा विक्री करताना आता जे महत्त्वाचे संकट आहे ते म्हणजे इतर भागातील, राज्यातील आंबा हा देवगड हापूस च्या नावाखाली मुंबई, पुणे, सांगली व अन्य भागातही मोठ्या प्रमाणावर विक्री केला जातो. देवगडमध्ये होणाऱ्या एकूण आंबा उत्पादनाच्या कितीतरी पटीने देवगड हापूस आंब्याची बोगस विक्री बाजारपेठेत होत असते. मग हा आंबा येतो कुठून तर कर्नाटक, बेंगलोर, गुजरात व अन्य सीमावर्ती भागातून येतो. याला बंद करण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अनेक वर्षे झगडून जीआय मानांकन प्राप्त केले आणि जीआय धारक शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र, नुसते जीआय मानांकन घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय व अन्य यंत्रणा कार्यरत नाही. यासाठी संस्थेने देवगड हापूस नावाने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावर यूआयडी प्रमाणे एक युनिक कोड असणारा स्टिकर लावण्याची सिस्टम डेव्हलप केलेली आहे आणि या पद्धतीचे पेटंटही घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.

तो युनिक कोड वापरणे देवगड हापूस नावाने विक्री करणाऱ्यांना बंधनकारक असेल. यामुळे ज्या आंब्यावर युनिक कोड असणारा स्टिकर असेल तोच आंबा देवगड हापूस असेल अशी ग्राहकाला ओळख होईल. ज्या आंब्यावर युनिक कोड असणारा स्टिकर नसेल तो आंबा देवगड हापूस असल्याची खात्री ग्राहकाला मिळणार नाही. त्यामुळे आपोआपच ग्राहक युनिक कोड असणाऱ्या देवगड हापूस च्या खरेदीकडे वळेल व खात्री असल्याने जास्तीचा भावही देईल. तरी या युनिक कोड स्टीकर चा वापर शेतकऱ्यांनी केल्यास, देवगड हापूसच्या नावाखाली अन्य भागातील जो आंबा विक्री केला जातो आणि पर्यायने देवगड हापूसला कमी भाव मिळतो त्याला कुठेतरी आळा बसेल. आणि भविष्यात हळूहळू देवगड हापूसची एक स्वतंत्र उत्तम अर्थव्यवस्था डेव्हलप होईल.

या पेटंटची, त्याच्या अंमलबजावणीची व त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांची माहिती सर्व बागायतदार शेतकरी विक्रेते बंधू-भगिनींना देण्याकरीता व त्याबाबत चर्चा करण्याकरता दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी, सकाळी 10 वाजता, मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे, येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व बागायतदार, विक्रेते, शेतकरी बंधू-भगिनींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजितराव गोगटे यांनी केले आहे.