दहावी-बारावी नापासांची परीक्षा होणार सोपी; फेरपरीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना दिलासा

जुलै महिन्यात होणारी दहावी, बारावीची फेरपरीक्षा यंदा विद्यार्थ्यांना सोपी जाऊ शकते. नुकत्याच जाहीर झालेल्या बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये फेरपरीक्षा होणार आहे. या फेरपरीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जावी यासाठी दहावी, बारावीच्या सर्व विषयांच्या सोप्या भाषेतील, सुटसुटीत नोट्स राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केल्या आहेत.

दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षी अनेक विद्यार्थी नापास होतात. हे नापास विद्यार्थी अनेकदा बोर्डाच्या परीक्षांच्या वाऱया करताना दिसतात. अपेक्षित यश न मिळत असल्याने काही वेळा ते शाळाबाह्य होण्याचा निर्णय घेतात किंवा त्यांच्यात नकारात्मक भावना निर्माण होऊन ते शैक्षणिक प्रगतीपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सर्व विषयांच्या सोप्या भाषेतील नोट्स तयार करण्यात आल्या असून लवकरच त्या नोट्स परिषदेच्या www.maa.ac.in या वेबसाईटवर अपलोड केल्या जाणार असल्याचे परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी सांगितले. तसेच हे ऑनलाईन साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचविता येईल, यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी यांना मार्गदर्शनही केला जाणार आहे.

दहावी, बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱया दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीची परीक्षा 16 ते 30 जुलै तर बारावी सर्वासाधारण व द्विलक्षी विषय व ऑनलाईन परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट आणि बारावी व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा 16 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. फेरपरीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर 3 जूनपासून उपलब्ध होणार आहे. परीक्षेपूर्वी शाळांमधून मिळणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. अन्य वेबसाईटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्सअॅप वरून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.