मंत्री आले दारी…रस्ता बनला लय भारी, दादा भुसे यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची फौज रात्रभर राबली

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज वाणगावजवळील ऐना गावातील शाळेला भेट दिली. मात्र मंत्री महोदय येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी चांगलेच कामाला लागले. दादा भुसे यांचा दणकेबाज प्रवास होऊ नये याकरिता बांधकाम खात्याची फौजच रस्त्यावर उतरली आणि त्यांनी रातोरात युद्धपातळीवर वधना ते वाणगाव मार्गाची डागडुजी केली. ही किमया पाहून गावकऱ्यांनीदेखील तोंडात बोटे घालत मंत्री आले दारी.. रस्ता बनला लय भारी, अशीच प्रतिक्रिया देत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

वाणगावजवळील ऐना गावात ग्राममंगल ही खासगी शाळा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील शिक्षण व्यवस्थेची माहिती घेण्यासाठी खुद्द शिक्षणमंत्री दादा भुसे आज या गावात आले होते. मात्र या गावाला जोडणारा
चार ते पाच किमीच्या रस्त्याची खड्यांमुळे युद्धपातळीवर डागडुजी अक्षरशः चाळण झाली होती. वर्षानुवर्षे खड्ड्यातून प्रवास करावा लागत असल्याने गावकरी तसेच विद्यार्थ्यांना अक्षरशः नकोसे झाले होते. याबाबत अनेकदा अर्ज-विनंत्या करून डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु त्याकडे प्रशासन कानाडोळा करत होते. मात्र शिक्षणमंत्री दादा भुसे हे या गावाला भेट देणार असल्याची माहिती मिळताच प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदार आणि त्यांच्या कामगारांची फौज गोळा करून रातोरात वधना ते वाणगाव मार्गाची डागडुजी केली. एकेक फूट पडलेल्या खड्ड्यांवर डांबराचा मुलामा टाकून हा मार्ग चकाचक केल्याने शिक्षणमंत्र्यांच्या पोटातील पाणीदेखील हलले नाही.