प्रो-कबड्डी लीग स्पर्धा आता उत्तरार्धाकडे झुकली आहे. उद्यापासून बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धेच्या बाद फेरीला प्रारंभ होणार आहे. हरियाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली या संघांनी गुणतक्त्यात अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान पटकावित उपांत्य फेरीत धडक दिलेली आहे. याचबरोबर यूपी योद्धाज विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात एलिमिनेटर -1, तर पाटणा पायरेट्स विरुद्ध यू मुम्बा यांच्यात एलिमिनेट-2 लढत रंगणार आहे. एलिमिनेटर लढती या उद्या (दि.26) होणार असून, यात कोणाचे आव्हान संपणार अन् कोण तरणार, याकडे तमाम कबड्डीशौकिनांचे लक्ष असेल.
प्रो-कबड्डी लीगमधील बाद फेरीच्या पार्श्वभूमीवर हरियाणाचे प्रशिक्षक मनप्रीत सिंग, दिल्ली संघाचे प्रशिक्षक जोगिंदर नरवाल, यूपी संघाचे प्रशिक्षक जसवीर सिंग, पाटणा संघाचे प्रशिक्षक नरेंदर रेधू, यू मुम्बा संघाचे प्रशिक्षक घोलमरेझा माझांदरनी, जयपूर संघाचे प्रशिक्षक संजीव बलियान बुधवारी पत्रकार परिषदेत एकत्र आले होते. बाद फेरीत चुकांना संधी नसते. सर्वोत्तम खेळ करणारा संघच येथे जिंकणार. मोठया लढतींचा दबाब कुठला संघ व्यवस्थित हाताळतो, यावरही बरेच काही अवलंबून असते, असे मत बाद फेरीत दाखल झालेल्या संघाच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केले.
हरयाणा संघाचे प्रशिक्षक मनप्रीतसिंग म्हणाले, येथे प्रत्येक संघ जिंकायलाच आला आहे. आता स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. आम्ही शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचा प्रतिस्पर्धी कोण, याचा विचार न करता, आमच्या जमेच्या बाजूंवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. थेट उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. दिल्ली संघाचे प्रशिक्षक जोगिंदर नरवाल म्हणाले, जो संघ चांगला खेळणार, तो जिंकणारच. आमची संघबांधणी मजबूत असून, याचे श्रेय माझ्यापेक्षा खेळाडूंनाच आहे. हीच एकजूट आम्ही उपांत्य फेरीत दाखविणार आहोत.
पाटणा संघाचे प्रशिक्षक नरेंदर रेधू म्हणाले, या मोसमात आम्ही काही लढती अखेरच्या क्षणी जिंकल्या आहेत. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. शेवटच्या क्षणी कच न खाणे हे आमच्या संघाचे वैशिष्टये आहे. नैसर्गिक खेळावर भर देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यूपी संघाचे प्रशिक्षक जसवीर सिंग म्हणाले, गेल्या मोसमात आमची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यानंतर संघात काय बदल करता येईल, याचा विचार आम्ही केला. संघात थोडे बदल केले. झालेल्या चुकांचा आढावा घेतला. त्यामुळेच तुम्ही यावेळी एक चांगला संघ बघत आहात. चुका मान्य करण्यात गैर काहीच नाहीत. त्या पुन्हा-पुन्हा होऊ नयेत, यावरच प्रशिक्षक म्हणून लक्ष द्यावे लागते.
अशा रंगतील लढती
26 डिसेंबर
एलिमिनेटर 1 यूपी योद्धाज – जयपूर पिंक पँथर्स रात्री 8वा.
एलिमिनेटर 2 पाटणा पायरेट्स – यू मुम्बा रात्री 9वा.
27 डिसेंबर (उपांत्य लढती)
हरियाणा स्टीलर्स – एलिमिनेटर 2 विजेता रात्री 8वा.
दबंग दिल्ली – एलिमिनेटर 1विजेता रात्री 9वा.
29 डिसेंबर अंतिम लढत रात्री 8वा.