लोकलचे दार अडवून मुजोरी, कल्याण, डोंबिवली स्थानकात चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांचे हाल

अंबरनाथ, बदलापूरहून येणारे लोकलमधील काही प्रवासी दरवाजा अडवून मुजोरी करत आहेत. यामुळे कल्याण, डोंबिवली स्थानकात चढ – उतार करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. काही हुल्लडबाज प्रवासी दारात खांबाला लटकत असतात. स्थानक आले की अर्धा दरवाजा बंद करत करतात. यामुळे अनेकदा प्रवाशांना विठ्ठलवाडी, उल्हासनगर येथे उतरून पुन्हा परतीचा प्रवास करावा लागत आहे. दार अडवणाऱ्या या मुजोर प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर स्थानकांवरून नियमित प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी लोकलच्या डब्यांमध्ये नव्या प्रकारे दादागिरी सुरू केली आहे. या प्रवाशांमधील काही जण डब्याच्या मधल्या खांबाला पकडून अर्धा दरवाजा बंद करतात. यामुळे डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवर चढ उतार करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गर्दीच्या वेळी सामान्य प्रवासी लोकलमध्ये प्रवेश कसा मिळेल या विचारात असतो. मात्र दरवाजे अडवणाऱ्यांमुळे बरेचदा वाद होतात. या दार अडवू प्रवाशांचा ग्रुप असतो. त्यामुळे त्यांच्याशी वाद टाळण्यासाठी प्रवासी पुढील स्थानकात उतरतात. याचा फटका मुख्यतः डोंबिवली आणि कल्याणमध्ये उतरणाऱ्या किंवा चढणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.