सांगली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या इमारतीतील पार्किंगच्या जागेला ओपन प्लॉटप्रमाणे मालमत्ताकर लागू करण्यास पक्ष, संघटनांनी विरोध केला होता. तरीदेखील महापालिका प्रशासनाने कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली असून, 10 चौरस मीटरच्या पार्किंग जागेला वर्षाकाठी केवळ 22 रुपये कर आकारला जाणार आहे.
महापालिकेने पार्किंगच्या जागेवर मालमत्ताकर आकारणीचा निर्णय घेतल्यापासून राजकीय, सामाजिक संघटनांनी त्यास विरोध केला. याप्रश्नी आंदोलनेही करण्यात आली; मात्र महापालिका प्रशासनाने याप्रश्नी शासननिर्णय व अन्य महापालिकांतील आकारणीचे दाखले देत स्पष्टीकरण दिले आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील मिळकतीमधील वाहन पार्किंग क्षेत्रावर यापुढे खुल्या जागेच्या दरानुसार आकारणी करण्यात येणार आहे. महासभेच्या मान्यतेनुसार उत्पन्नवाढीसाठी तसेच महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये देण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने ही कर आकारणी केली जात आहे.
राज्यातील अन्य ‘ड’ वर्ग महापालिकेमध्ये वाहन पार्किंग कर आकारणी करण्यात येत आहे. आता सांगली, मिरज, कुपवाड शहरांतही तो कर आकारला जाईल. एखाद्या इमारतीत 10 चौरस मीटर पार्किंग क्षेत्र असेल तर त्यास ओपन प्लॉटप्रमाणे साडेचार रुपये दर लावला जाईल. त्यामुळे त्याचे मूल्य 45 रुपये होईल. त्यावर 48 टक्क्यांप्रमाणे 22 रुपये वार्षिक कर लागू होईल. म्हणजेच एका वाहनाच्या पार्किंगसाठी वार्षिक 22 रुपये कर लागू होईल.
कर भरून सहकार्य करावे – शिल्पा दरेकर
महापालिका क्षेत्रातील पार्किंगच्या कराची आकारणी नियमानुसार व अन्य महापालिकांप्रमाणे केली जाणार आहे. पार्किंग क्षेत्राला लागू असलेला कर घरपट्टी बिलामध्ये 2024-25 या आर्थिक वर्षापासून अंशतः समाविष्ट केला आहे. त्यामुळे या कराची आकारणी घरपट्टी बिलात केल्यानंतर त्याचा भरणा करून नागरिकांनी सहकार्य करावे. एकरकमी बिल भरल्यास जूनअखेर 10 टक्के त्यानंतर जुलैअखेर 5 टक्के सवलत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी केले आहे.