
प्रतिष्ठेच्या ऑस्कर अॅवॉर्ड 2025 चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. हिंदुस्थानातून 3 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजल्यापासून थेट सोहळा ऑनलाइन पाहता येईल. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये रंगणाऱ्या सोहळ्यात जगभरातील सिनेतारका रेड कॉर्पेटवर अवतरतील. एम्मा स्टोन, गॅल गॅडोट, ओप्रा, झो सलदाना, सेलेना गोमेझ, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, स्कारलेट जोहानसन, अना डी आर्मास, विलेम डॅपह् आणि लिली-रोज डेप यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती असेल. गेल्या वर्षभरातील चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना कलावंताना सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.
‘अनुजा’ शर्यतीत
हिंदुस्थानी वंशाच्या निर्मात्या गुनीत मोंगा यांचा चित्रपट ‘अनुजा’ ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहे. 2023 मध्ये, गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या चित्रपटाने ऑस्कर जिंकला होता. आता पुन्हा एकदा गुनीत मोंगा यांचा चित्रपट ऑस्कर जिंकेल की, नाही हे लवकरच समजेल. प्रियांका चोप्रा या चित्रपटाची कार्यकारी निर्माती आहे.
जॅक ऑडियार्ड दिग्दर्शित ‘एमिलिया पेरेझ’ हा चित्रपट 13 नामांकनांसह आघाडीवर आहे. हा चित्रपट ऑस्कर अॅवॉर्ड जिंकेल अशी अपेक्षा केली जात आहे. याशिवाय ‘द ब्रूटलिस्ट’ आणि ‘विकेड’ दोघांनाही 10 नामांकने मिळाली आहेत.