दापोली शहरातील एकमेव स्वच्छतागृहालाही टाळे

जेथे प्रशासन खंबीर नसते तेथे समस्या गंभीर बनते असाच काहीसा प्रकार दापोली नगर पंचायत प्रशासनाच्या बाबतीत घडला आहे. दापोली नगर पंचायत प्रशासनाच्या ताब्यातील एकमेव अशा स्वच्छतागृहाला टाळे लावून लोकांना उघडयावर प्रातः विधी उरकण्यास खतपाणी घालण्याच्या या नगर पंचायतीच्या किळसवाण्या प्रकाराने शहरात दुर्गंधी तर पसरणार आहेच शिवाय पसरणाऱ्या दुर्गंधीने डासांचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य साथीच्या रोगाचा प्रसार होण्याचा धोका आहे.

दापोली नगर पंचायत हद्दीतून जाणाऱ्या दापोली जालगाव दाभोळ मार्गावर शहरात एकमेव असे सुलभ शौचालय आहे. या शौचालयासाठी शासनाने तब्बल 32 लाखांपेक्षा अधिकचा निधी बांधकामावर खर्च केला आहे. मात्र हे शौचालय नागरिकांना वापरासाठी देण्यास दापोली नगर पंचायत प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरत आहे त्यामुळे शौचालयाच्या बांधकामासाठी शासनाने खर्च केलेला शासनाचा लाखो रूपयांचा निधी हा दापोली नगर पंचायत प्रशासन खंबीर नसल्याने पाण्यातच गेल्यात जमा आहे.

शासनाच्या निधीतून दापोली शहरात नगर पंचायतीकडून बांधण्यात आलेला एकमेव असाच एक सुलभ शौचालय आहे. मात्र या शौचालयाला टाळे लावण्यात आल्याने नागरिकांना शौचालयाचा वापर करता येत नाही. त्यामुळे शहरातील स्वच्छतेची समस्या गंभीर बनणार आहे. दापोली शहराचे झपाटयाने होणारे शहरीकरण पाहता तसेच पर्यटनदृष्टया दापोलीचे वाढलेले महत्व लक्षात घेता आणि दापोलीत कोकण कृषी नावाचे कृषी विषयक अभ्यासक्रम शिकविण्याचे विदयापीठ असल्याने दापोली हे शैक्षणिक हब केंद्र उदयास आलेले आहे .त्यामुळे दापोलीत राज्याच्या कानाकोप-यासह देशभरातून येथे येणा-यांचे प्रमाण देखील खुपच वाढलेले आहे. असे असतानाही दापोली नगर पंचायत प्रशासन हे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून शहरातील स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक असतानाही नगर पंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांर्भियांने घेताना दिसत नाही. त्यामुळे शहरात लहान मोठे व्यवसाय करणा-या महिलांना आपल्या लघूशंकासाठी शरमेने एखादया ईमारती वा झाडांच्या आडोशाचा आधार घ्यावा लागत आहे. ही बाब नगर पंचायत प्रशासनास भुषणावह नाही तर शहरात येणारे काहीजन हे आपल्या प्रातःविधी या उघडयावरच उरकत असल्याने शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र ढीम्म नगर पंचायत प्रशासन या महत्वाच्या समस्येकडे लक्षच देत नाही. या संदर्भात नगर पंचायतीचे सीईओ संकेत गायकवाड यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता ते याबाबत अनभिज्ञ होते. याचाच अर्थ नगर पंचायत प्रशासनाचा सावळा गोंधळ दिसून येतो.