ओबीसी चळवळीने महापुरुषाच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ केली नाही; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंना टोला

मंडल स्तंभ हे उर्जास्थळ आहे. येथूनच ओबीसी भटक्या विमुक्तांना न्याय देण्याचे काम झाले. त्यामुळे येथूनच आंदोलनाची ज्योत पेटवून ओबीसी जनआक्रोश यात्रेला प्रारंभ करण्यात येत असल्याचे प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले. ओबीसी चळवळीने कधी महापुरुषांच्या पुतळ्याखाली बसून कुणाला शिवीगाळ केली नाही, असा टोलाही त्यांनी मनोज जरांगे यांना लगावला.

अंबड तालुक्यातील दोदडगाव येथून ओबीसी जनआक्रोश यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मंडल स्तंभाला अभिवादन करून यात्रा पुढे मार्गस्थ झाली. यावेळी बोलताना प्रा. लक्ष्मण हाके यांनी मंडल आयोगाने दिलेले आरक्षण वाचवण्यासाठी याच प्रवर्गातील लोकांना पुढे यावे लागेल असे आवाहन केले. काही लोक बेकायदेशील आरक्षण मागत आहेत. हा राजकीय अजेंडा असल्याचा आरोपही प्रा. हाके यांनी केला. जर आमची रॅली छगन भुजबळ पुरस्कृत असेल तर मनोज जरांगे यांचे उपोषण कुणी पुरस्कृत केले आहे याचेही उत्तर मिळाले पाहिजे अशी मागणी प्रा. हाके यांनी केली.

आमचे पुरावे आम्ही दाखवू – नवनाथ वाघमारे
मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे आहेत. त्यांनी त्यांच्याकडचे पुरावे दाखवावेत आम्ही आमचे पुरावे आम्ही दाखवू, मग कळेल खरे काय आणि खोटे काय, असे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे बोलताना म्हणाले. यावेळी प्रा. सत्संग मुंढे, अशोक पांगारकर यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बाधवांची उपस्थिती होती.