हातकणंगलेची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर! आळतेसह परिसरात डेंग्यू, काविळच्या रुग्णांत वाढ

हातकणंगले तालुक्यातील आळते येथे गेल्या एक महिन्यापासून डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्यासारखी स्थिती आहे. गेल्या 15 दिवसांत या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांत गावात डेंग्यू हा आजार दुसऱयांदा पसरत आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने व नागरिकांचा हलगर्जीपणा होत असल्याने ही संख्या वाढत चालली आहे. परिणामी रुग्णांची प्रकृती अचानक खालावत असल्याने उपचारासाठी गोरगरीब नागरिकांना सांगली, इचलकरंजी तसेच खासगी आरोग्य केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे. यात अनेक रुग्ण दुसऱयांदा डेंग्यू संशयित उपचार घेत आहेत. यात सर्वसामान्य नागरिकांचे हजारो रुपये उपचारासाठी खर्च होत आहेत. संबंधित प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना राबवून डेंग्यूची साखळी मोडीत काढावी, अशी मागणी होत आहे.

गावात गेल्या एक महिन्यापासून कुंभारगल्ली, हावळेगल्ली, पाटील गल्ली, टारेगल्ली या ठिकाणी संशयित डेंग्यू रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातील 36 रक्ताचे नमुने पाठवण्यात आले होते. यापैकी दोन रुग्ण संक्रमित आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे. घरोघरी जाऊन आरोग्यसेवक व आशा सेविका यांच्यामार्फत संबंधित घराची पाहणी करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 1505 घरांची तपासणी करण्यात आली असून, यात 7019 नागरिकांची माहिती घेण्यात आली आहे. 4365 बाहेर ठेवलेले पाण्याचे हौद तपासण्यात आले असून, यात 77 घरे दूषित आढळली आहेत. वाढत असलेल्या संशयित रुग्णांची संख्या अद्यापही आटोक्यात आलेली नाही. यामुळे संबंधित विभागाकडून हलगर्जीपणा होत असून, भविष्यात धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाने एकत्रित येऊन विविध टीमच्या माध्यमातून उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

गेल्या सहा महिन्यांत दुसऱयांदा डेंग्यूने डोके वर काढले आहे. आरोग्य यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांच्यातील नियोजनाअभावी पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना जरी गांभीर्य नसले तरी मागील डेंग्यूच्या साथीत एका महिलेला डेंग्यूमुळे जीव गमवावा लागला आहे. गावातील स्थानिक डॉक्टरांकडे तापाच्या रुग्णांच्या अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र आहे. पोषक वातावरणामुळे डेंग्यू आजाराची  साखळी तोडणेही मुश्कील झाले आहे.

बाहेरची टीम लावून घरोघरी सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. तसेच रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. आम्ही वरिष्ठांना यासंबंधी माहिती कळवली आहे.

– प्रसाद दातार, तालुका वैद्यकीय अधिकारी

गावातील ज्या भागात संशयित रुग्ण आहेत, त्या भागात दररोज धूर फवारणी सुरू आहे. सर्व्हेची टीमही कार्यरत आहे. दोन दिवसांत संपूर्ण गावातील कचरा साफ करण्यासाठी बाहेरील टीम बोलाविली आहे. ग्रामपंचायत यासाठी सर्व उपाययोजना राबवत असून, नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवून ग्रामपंचायतला सहकार्य करावे.

–  अजिंक्य इंगवले, सरपंच