देशातील सर्व शाळांमध्ये पुरुष शिक्षकांच्या तुलनेत महिला शिक्षकांची संख्या अधिक आहे. देशातील 14.72 लाख शाळांमध्ये एकूण 98 लाख शिक्षक आहेत. त्यापैकी 52.3 लाख या शिक्षिका आहेत. 2018 ते 2019 मध्ये ही संख्या 47.14 लाख होती. तेव्हापासून शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या वाढत आहे. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन प्लसने 2023 ते 2024 च्या अहवालात ही आकडेवारी जाहीर केली आहे. सरकारी शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या वाढत असल्याचे युडीआयएसई प्लस अहवालातूनही स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सरकारी शाळांमध्ये मात्र पुरुष शिक्षकांची संख्या जास्त आहे.
2018-19 मध्ये पुरुष शिक्षकांची संख्या 50 टक्के होती. एकूण 94.3 लाख शाळा शिक्षकांपैकी 47.16 लाख शिक्षक पुरुष होते. त्यात 47.14 लाख म्हणजे 49.98 टक्के महिला शिक्षिका होत्या. 2023-24 मध्ये महिला शिक्षकांची संख्या 52 लाख झाली आहे, तर पुरुष शिक्षकांची संख्या घटून 45.7 लाख झाली आहे. टक्केवारीत पाहिल्यास महिला शिक्षकांचा वाटा 3.3 टक्क्यांनी वाढून 53.3 टक्के झाला आहे, तर पुरुष शिक्षकांचा वाटा 3 टक्क्यांवरून 46.6 टक्के झाला आहे.