NEET Exam : आता ऑनलाईन परीक्षा होणार, पेपरफुटी प्रकरणानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट युजी पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षांबाबत सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता पेन आणि पेपर ऐवजी ऑनलाईन नीट परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे.

दरम्यान, नीट परीक्षा घोटाळ्याचे संसदेतही पडसाद उमटले. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले आहे. यामुळे या परीक्षेबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सध्या नीट परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये घेतली जाते. हा पेपर एमसीक्यू फॉर्मेटमध्ये असतो. विद्यार्थ्यांना यात पर्याय देण्यात येतात. त्यापैकी योग्य उत्तर विद्यार्थी ओएमआर शीटवर लिहितात. यानंतर ही शीट स्कॅन केली जाते. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे NEET परीक्षा घेतली जाते.

तत्कालीन शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 2018 मध्ये नीट परीक्षा ऑनलाईन घेण्याची घोषणा केली होती. मात्र गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करत आरोग्य मंत्रालयाने या निर्णयाला विरोध केला. यामुळे शिक्षण मंत्रालयाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. मात्र यंदाच्या नीट परीक्षेतील घोळ पाहता सरकार पुन्हा ऑनलाईन परीक्षेसाठी विचाराधीन आहे. याबाबत अंतिम निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) वर अवलंबून आहे.