महागाईच्या आगीत तेल, ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या किमतीत 20 टक्के वाढ

भाज्या, कडधान्ये कडाडली असून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आधीच देश महागाईत होरपळत असताना आता खाद्यतेलावरील आयात शुल्कात तब्बल 20 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर लिटरमागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार असून ऐन नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीत तेलाला महागाईची फोडणी बसणार आहे. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट अक्षरशः कोलमडणारआहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने खास अधिसूचना काढून ही माहिती दिली आहे. क्रूड तसेच रिफाईंड सनफ्लॉवर ऑईलसह इतर खाद्य तेलांवरील आयात करात 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. क्रूड, पाम ऑईल, क्रूड सोयाबीन तेल, क्रूड सनफ्लॉवर सीड ऑईलवर आतापर्यंत आयात कर शून्य होता. आता हाच आयात कर 20 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे या तेलांवरील बेसिक कस्टम डय़ूटी 32.5 वर गेली आहे. हा बदल लगेचच होणार आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या भाववाढीचाही भडका उडणार आहे.

आयात कर वाढवल्यानंतर सर्व खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क वाढून 35.75 टक्के होणार आहे. क्रूड पाम ऑईल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑईलवरील दर 5.5 टक्क्यांनी वाढून 27.5 टक्के होईल. रिफाईंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाईंड पाम ऑइल आणि रिफाईंड सोयाबीन तेलावरील आयात शुल्कही 13.75 टक्क्यांवरून थेट 35.75 टक्क्यांवर पोहोचणार आहे.

तेल            सध्याचा भाव         वाढीव भाव

करडई               200                    210

शेंगदाणा           194                    200

सोयाबीन           120                    130

सूर्यफूल             125                    130

सरकी                118                    128

पाम                  118                    128

तीळ                  220                    230

मोहरी               200                    220

राईसब्रान           130                    150

n सणासुदीच्या काळातच खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या जात असल्याचे एनडीए सरकारच्या कार्यकाळात वारंवार उघड झाले आहे. सोयाबीन तेलाचा 15 लिटरचा डबा चार दिवसांपूर्वी 1700 रुपयांपर्यंत मिळत होता. आज या डब्याची पिंमत थेट 2100 रुपयांवर पोहोचली. तब्बल 400 रुपये वाढल्याने हॉटेलचालक, रेस्टारंट, मेसचालकांना याचा मोठा फटका बसला आहे. ही भाववाढ ग्राहकांना परवडणारी नसल्याने आम्ही दररोज विक्री होणारा समोसा, फाफडा, पोहे, भजे किती रुपयांना विकावे, असा सवाल हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.