मुंबईकर पालिकेला अनेक प्रकारचा कर भरीत असताना शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईच्या स्वच्छतेची ही स्थिती झाली आहे. तर मुंबईतील कचरा उचलणे हे पालिकेचे कर्तव्य असताना आता कचऱ्यावर युजर फीच्या नावाखाली कर लादण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र असा कचऱ्यावर कर आकारू देणार नाही. प्रसंगी याविरोधात आंदोलन उभारू, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.
पालिका मुंबईकरांवर रोजचा कचरा उचलण्याकरिता युजर फी’ आकारण्याचा विचार करत आहे. याआधी कधीही असे घडलेले नाही. बीएमसीचे हे कर्तव्य असताना मुंबईकरांनी या सेवेसाठी पैसे का द्यावेत, असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला केला. तसेच आम्ही पालिकेच्या माध्यमातून अनेक वेळा मुंबईची सेवा केली आहे, पण मुंबईकरांवर कधीही असा आर्थिक बोजा लादला नाही. मात्र आता कचरा उचलण्यासाठी कर लावण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मिंध्यांच्या भ्रष्टाचारी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका!
मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटाळ्यासह गेल्या दोन वर्षांत मिंधे सरकारच्या आशीर्वादाने झालेले अनेक घोटाळे उघड केले आहेत. असे असताना आता भाजपला या घोटाळ्यांसंदर्भात ‘एसआयटी’ स्थापन करण्याची आठवण झाली आहे. मी 15 जानेवारी 2023 रोजी हा घोटाळा उघड केला होता. त्यानंतरही सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला होता. पण तेव्हा भाजपने शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला पाठिंबा दिला होता. जर मुख्यमंत्र्यांना खरोखरच नवीन सुरुवात करायची असेल तर या भ्रष्टाचाराचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे. त्यात तत्कालीन घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे आणि मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांची चौकशी करणार का, असा सवाल करतानाच नव्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिंबा देऊ नका, म्हणजे आम्ही तुम्हाला वॉशिंग मशीन मानणार नाही, असे आव्हानच त्यांनी दिले.