राडारोड्यापासून बनणार बेंच, पेव्हर ब्लॉक, कंपाऊंड वॉल!

मुंबईत सुरू असलेल्या बांधकांमध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या डेब्रिजपासून पालिका आता बेंच, पेव्हर ब्लॉक, पंपाऊंड वॉल, बांधकामासाठी लागणारी रेती अशा प्रकारचे साहित्य तयार करणार आहे. यासाठी पालिकेने दहिसर पूर्व कोकणीपाडा येथे पाच एकर जागेवर भव्य डेब्रिज पुनर्प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला असून आज याचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे मुंबईतील डेब्रिजचा प्रश्न मिटणार आहे.

पालिकेने पहिल्या टप्प्यात पश्चिम उपनगरासाठी दररोज 600 मेट्रिक टन राडारोडय़ावर प्रक्रिया करून तो पुनर्वापरासाठी तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी मुंबईकरांना मोफत डेब्रिज जमा करण्यासाठी पालिकेने 18002109976 हा टोल फ्री क्रमांकही प्रसिद्ध केला आहे. या ठिकाणी सकाळी 8 ते रात्री यावर नोव्हेंबरपासून आतापर्यंत 220 कॉल्स आले असून 54 मेट्रिक टन राडारोड्याचे संकलन करण्यात आले आहे. 4 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली हे काम वेगाने सुरू आहे.