गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या भूमिगत बोगद्यांचा खर्च 250 कोटींनी वाढला असून याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. बोगद्यांच्या फिल्मसिटीजवळील पूर्वनियोजित जागेला स्थानिकांनी विरोध केल्यामुळे टनेलिंगच्या सुरुवातीची जागा 600 मीटरनी स्थलांतरित करण्यात आल्याने हा खर्च वाढल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे प्रकल्पाचा खर्च 14 हजार 50 कोटींवर गेला आहे.
मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) वाहनचालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून यामुळे वेळ आणि पेट्रोलचीही बचत होणार आहे. या प्रकल्पात गोरेगाव पूर्व येथून 4.70 किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत जुळे बोगदे आहेत. मात्र फिल्मसिटीच्या हबाळेपाडा येथून सुरू होणाऱ्या बोगद्याच्या ठिकाणीच काही स्थानिकांची घरे आणि रोजगार असल्याने त्यांनी स्थलांतरास नकार दिला आहे. हा तिढा न सुटल्याने काम रखडण्यापेक्षा यावर पर्याय म्हणून मुंबई महापालिकेने सध्याचे बोगद्याचे ठिकाण 600 मीटर अंतरावर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
8 हजार कोटींचा खर्च 14 हजार कोटीवर
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी काम सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम सुरुवातीला 8 हजार 850 कोटी रुपयांमध्ये करण्यात येणार होते. मात्र या प्रकल्पाचा आता एकूण खर्च वाढत जाऊन 14 हजार कोटींवर गेला आहे. ‘जीएमएलआर’ने पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्यात येतील.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची एकूण लांबी 12.2 किमी असून यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली दोन 4.7 किमी लांबीचे दोन भूमिगत बोगदे तयार करण्यात येणार आहेत. शिवाय या लिंक रोडच्या कामात गोरेगाव फिल्मसिटीतील प्रस्तावित कट आणि कव्हर भुयारी मार्गाची लांबीही 1.02 किमी आहे.
असे आहेत बोगदे : या प्रकल्पात गोरेगाव पूर्व येथून 4.70 किलोमीटर लांबीचे दोन जुळे बोगदे असून प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. गोरेगाव फिल्मसिटी खिंडीपाडापर्यंत असणाऱ्या या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. हे काम पाच वर्षांत पूर्ण केले जाईल.