आजपासून राष्ट्रीय श्रेष्ठत्वाची लढाई, इराणी करंडकासाठी शेष हिंदुस्थान-मुंबई आमने-सामने

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रणजी विजेता मुंबई आणि ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदाखाली शेष हिंदुस्थान मंगळवारपासून प्रतिष्ठेच्या इराणी करंडक स्पर्धेसाठी भिडणार आहे. 1 ते 5 ऑक्टोबरदरम्यान एकाना स्टेडियमवर राष्ट्रीय क्रिकेटच्या श्रेष्ठत्वासाठी दिग्गज खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.

इराणी करंडक म्हणजे शेष हिंदुस्थानी संघाची मक्तेदारी. या स्पर्धेत तब्बल 30 वेळा शेष हिंदुस्थाननेच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर मुंबईला केवळ 14 वेळा इराणी करंडकाचे जेतेपद पटकावता आले आहे. शेष हिंदुस्थानने गेल्या तिन्ही स्पर्धा जिंकल्या आहेतच. त्यामुळे यंदा जेतेपदाचा चौकार खेचण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.

दुसरीकडे मुंबईला गेली 26 वर्षे जेतेपद पटकावता आलेले नाही. मुंबईची ताकद पाहता ते आपला तीन दशकांचा दुष्काळ संपवण्यासाठी झुंज देणार आहेत. 1997-98 साली मुंबईने इराणी करंडकावर आपले नाव कोरले होते. त्यानंतर ते तब्बल आठ वेळा इराणी करंडकासाठी शेष हिंदुस्थानविरुद्ध भिडले, पण त्यांच्या पदरी अपयशच आले आहे. ते अपयश धुऊन काढणे हेच अजिंक्य रहाणेचे प्रयत्न असतील.

फॉर्मात असलेला मुशीर खान अपघातात जखमी झाल्यामुळे इराणी करंडकाबाहेर फेकला गेला आहे. हा मुंबईसाठी खूप मोठा धक्का असला तरी आता त्याच्या जागी मुंबईचा भरवशाचा फलंदाज आणि मुशीर खानचा थोरला भाऊ सरफराज खान घेईल. कानपूर कसोटीतही सरफराजला संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याच्यासह ध्रुव जुरेल, यश दयाल यांना इराणी करंडकासाठी मुक्त करण्यात आले आहे. हे तिन्ही खेळाडू दोन्ही संघांमध्ये खेळण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईचा तगडा संघ

मुंबई संघात मुशीर नसला तरी इराणी करंडकात मुंबईचा तगडा संघ उतरणार हे निश्चित. मुंबईचे नेतृत्व साहजिकच अजिंक्यच्या हाती असेल, पण त्याला साथ लाभणार आहे ती श्रेयस अय्यर, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ, शम्स मुलानी यांची. एवढेच नव्हे तर, सिद्धेश लाडही मुंबईसाठी खेळणार आहे. मुंबईची फलंदाजी बलाढ्य आहेच, पण तनुष कोटियन, शम्स मुलानी हे फिरकीवीर शेष हिंदुस्थानी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. मुंबईचा वेगवान मारा मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस आणि शार्दुल ठाकूर हे त्रिकूट सांभाळतील.

गायकवाडला सुवर्ण संधी

ऋतुराज गायकवाडला हिंदुस्थानचे भवितव्य म्हणून पाहिले जात आहे. उद्या एकाना स्टेडियमवर इशान किशन आणि ध्रुव जुरेल हे हिंदुस्थानचे दोन्ही यष्टिरक्षक शेष हिंदुस्थानी संघात दिसण्याची शक्यता आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघात दोन-तीन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या सामन्यात दमदार आणि तुफानी खेळ करणाऱ्या खेळाडूंना संघाचे पोलादी द्वार उघडले जाऊ शकते. त्यामुळे सारेच खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरणार हे निश्चित आहे.

इराणी करंडक स्पर्धेसाठी संघ

शेष हिंदुस्थान – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), मानव सुतार, सारांश जैन, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.

मुंबई – अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, सरफराज खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), हिमांशु सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रॉयस्टन डायस.