वर्सोवा ते घाटकोपर यादरम्यान धावणाऱया मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांची आता तिकीट सांभाळण्याची कटकट मिटणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ‘मुंबई मेट्रो वन’ प्रशासनाने बिलबॉक्स प्युअररिस्ट टेक सोल्युशन या कंपनीच्या सहकार्याने ‘टॅप टॅप’ नावाचे रिस्टबॅण्ड लाँच केले आहे. मेट्रोच्या एएफसी गेटवर म्हणजेच एंट्री आणि एक्झिटवर रिस्टबॅंडला केवळ टॅप करून प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे तिकीट सांभाळण्याची कटकट मिटणार असून प्रवाशांच्या वेळेची देखील बचत होणार आहे. अवघ्या 200 रुपयांत हा रिस्टबॅंड मुंबई मेट्रो वनच्या कस्टमर केअर सेंटरवर उपलब्ध असून यात रिचार्जची देखील सोय आहे. गेल्या 10 वर्षात मेट्रो 1 मधून 950 मिलियन प्रवाशांनी प्रवास केला असून प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल क्यूआर तिकीट, बँक कॉम्बो कार्ड, अनलिमिटेड ट्रव्हल पास अशा विविध योजना आणल्या आहेत.