शहरातील मध्यमवर्गीयांना 300 युनिट वीज मोफत मिळालीच पाहिजे; शिवसेनेचा राज्यभरात जबरदस्त एल्गार

प्रचंड वाढलेल्या महागाईत सर्वसामान्य नागरिक होरपळत असताना वाढत्या वीज बिलामुळे अक्षरशः नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रमाणे शहरी भागातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांनाही 300 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी जोरदार मागणी करीत आज शिवसेनेने आंदोलन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार झालेल्या या आंदोलनात सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देणारे राज्यातील महायुती सरकार शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना मात्र सपशेल विसरले आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड वाढली असल्याने येणारे भरमसाट बिल भरणे शहरी भागातील मध्यमवर्गीयांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध शहरी भागातील गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी आणि वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मध्यमवर्गीयांच्या बेताच्या आर्थिक स्थितीमुळे दरमहा येणारे भरमसाट बिल भरणे कठीण झाले आहे. याची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने झोपलेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शिवसेना विभाग क्र. 10 च्या वतीने जुन्या इमारती आणि झोपडपट्टींना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी शिवसेना भवन येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव, विठ्ठल पवार यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

सरकार, अदानीच्या पुतळ्याचे दहन, ठिय्या

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी शहरांमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवसैनिकांसोबत महिला आघाडीही मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती. यावेळी आंदोलकांनी सरकार, अदानीच्या पुतळ्यांचे दहन करीत ठिय्याही मांडला.