पॉर्न स्टारप्रकरणी ट्रम्प यांच्या शिक्षेला स्थगिती; 26 नोव्हेंबरनंतर कोर्ट शिक्षा सुनावणार

पॉर्न स्टारप्रकरणी दोषी ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनहॅटन कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर दोषी ट्रम्प यांना कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. ट्रम्प यांना जुलैमध्येच शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र त्यानंतर ती 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या वर्षी 30 मे रोजी न्यायालयाने ट्रम्प यांना 34 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले होते. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे देणे आणि 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान व्यावसायिक रेकॉर्ड खोटे दाखवणे यांसारखे आरोप आहेत. या सर्व गुन्ह्यांत दोषी आढळलेले ट्रम्प हे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. जर 18 सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात आली तर यातून एक संदेश जाईल की, निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी हे सर्व केले गेले आहे, असे या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश जुआन मार्चेन यांनी म्हटले. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आपल्या शिक्षेचे प्रकरण संपवण्याची मागणीही केली आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

ट्रम्प यांच्यावर व्यावसायिक रेकॉर्ड खोटे केल्याचे 34 गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोप पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी मौन बाळगण्यासाठी 1 लाख 30 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 1 कोटी 7 लाख रुपये देण्याशी संबंधित आहेत. ट्रम्प यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल तिने काहीही बोलू नये म्हणून त्यांनी ट्रम्पच्या सांगण्यावरून स्टॉर्मीला पैसे दिले होते.