हीच का मोदींची गॅरंटी; पहिल्याच पावसात रामनगरीच्या विकासाची पोलखोल

पहिल्याच पावसाने रामनगरी अयोध्या पाण्याखाली गेली. डोळय़ाचे पारणे फेडणारे राम मंदिर आणि भाविकांसाठी उत्तम रस्ते, विविध सोयीसुविधा देऊन केलेल्या विकासकामांच्या दाव्याची या पावसाने अक्षरशः पोलखोल केली. मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग पाण्याखाली गेला. आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. इतकेच नाही तर राम मंदिराच्या गर्भगृहालाही पावसामुळे गळती लागल्याने विरोधकांनी अयोध्या विकासाचे 30 हजार कोटी गेले कुठे? असा सवाल केला आहे.

कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत राम मंदिरापर्यंत पोहोचावे लागत आहे. गटाराचे आणि पावसाचे पाणी एकमेकांत मिसळल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे. राम मंदिर परिसरातील जलवानपुरा आणि आसपासच्या भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पहिल्याच पावसात रामनगरीची दाणादाण उडवून दिल्यामुळे पाहुणे आणि भाविकांचा पुरता हिरमोड झाला आहे.

दोन ते अडीच हजार भाविकांची गैरसोय

रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत रोज दोन ते अडीच हजार भाविक येतात. त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे अयोध्येतील नागरिकांनी सांगितले. या पाण्यातून बाईक, चारचाकी वाहनेही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढतच गेस्ट हाऊस गाठावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

घाईघाईत केलेल्या उद्घाटनाचा परिणाम

राम मंदिर बांधताना घाईघाईत विकास आराखडा तयार करण्यात आला. रामपथ बांधण्यात आला. त्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूदही केली गेली. त्याचाच परिणाम स्थानिक, भाविक आणि येथे येणाऱया पर्यटकांना पहिल्याच पावसात भोगावा लागत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.