भाजपला सर्वाधिक देणग्या देणाऱ्या हैदराबादच्या मेघा इन्फ्रास्ट्रक्चरवर जलविद्युत प्रकल्पाची खैरात, अदानीनंतर महाराष्ट्रात मेघा इन्फ्रा ‘लाडकी’

भाजपला निवडणूक बॉण्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणग्या देणाऱ्या हैदराबादमधील मेघा इंजिनीयरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने आता महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. संभाजीनगरमध्ये जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या कंत्राटाची खैरात महायुती सरकारने ‘मेघा’ इन्फ्रास्ट्रक्चरवर केली आहे. जम्मू-कश्मीरपासून दक्षिणेच्या राज्यातील कंत्राटे मिळवणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रात कंत्राट देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली आहे.

जळगाव येथून 200 मेगावॅट घोसला उदंचन जलविद्युत प्रकल्पाचा छत्रपती संभाजीनगर येथील सोयगाव तालुक्यापर्यंत विकसित करण्याच्या प्रकल्पाचा प्रस्ताव जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून राज्याच्या जलसंपदा विभागाला सादर झाला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्याचे अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीला दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

भाजपला 586 कोटींचे निवडणूक बॉण्ड

भाजपला देणग्या देणाऱ्या कंपन्यांचा निवडणूक बॉण्डचा मुद्दा मध्यंतरी प्रचंड गाजला होता. पेंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक बॉण्डचा संपूर्ण तपशील डेटा बॉण्ड क्रमांक आणि एसबीआय शाखेच्या तपशीलांसह अपलोड केला होता. त्यात हैदराबादमधील मेधा इंजिनीयरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिडेट या कंपनीने 586 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी करून भाजपला सर्वाधिक देणगी दिली होती. त्याची परतफेड म्हणून केंद्रातील भाजप सरकारने अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची खैरात या कंपनीवर केली. जम्मू-कश्मीरमधील झोजिला बोगदा (टनेल) प्रकल्पाचे कंत्राट मिळाले होते. त्यानंतर या कंपनीने एक मीडिया ग्रुप विकत घेतला. तेलंगणातील बीआरएस या पक्षालाही देणगी दिली होती. तामीळनाडूतील वायआरएस काँग्रेस, जेडी (एस), जनसेना पार्टी, जेडी (यू) अशा राजकीय पक्षांनाही बॉण्डचे दान केले होते.

कंपनीची पार्श्वभूमी

उद्योगपती पमीरेड्डी पिची रेड्डी यांनी मेघा इंजिनीयरिंग एंटरप्रायझेस कंपनी स्थापन केली. 2006 मध्ये कंपनीने नाव बदलून मेघा इंजिनीयरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर  असे नामकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातील म्हणजे 2019 ते 2020 आणि 2023 आणि 2024 या आर्थिक वर्षात एकूण 966 कोटी रुपयांचे  निवडणूक बॉण्ड खरेदी केले. त्यानंतर या कंपनीने धरणे, नैसर्गिक वायू वितरण, वीज प्रकल्प आणि रस्ते अशा क्षेत्रांत प्रवेश केला. मोदींच्या काळात या कंपनीचा आलेख गगनाला भिडला.

महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास सुरुवात

देशातल्या विविध राज्यांत खासकरून भाजपशासित राज्यांत कंपनीला विविध प्रकल्पांची कंत्राटे मिळू लागली. अदानीपाठोपाठ आता महाराष्ट्रात या ‘मेघा’ या कंपनीला आणखीन काही कंत्राट मिळण्याची शक्यता मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.