डिलिव्हरी बॉयची दिवसा रेकी; रात्री रिक्षा, दुचाकींची चोरी

कल्याणच्या एका खासगी कंपनीत काम करणारा डिलिव्हरी बॉयच सराईत चोरटा निघाल्याची बाब उघडकीस आली आहे. कुणाल साबळे असे या सराईत चोरट्याचे नाव असून तो दुचाकी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

कुणाल हा सराईत चोरटा असून तो पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो दिवसभर डिलिव्हरी करताना रेखी करायचा आणि संधी साधून गाड्यांची चोरी करायचा. गणेशोत्सवात पोलीस बंदोबस्तात व्यस्त असताना त्याने दुचाकी आणि रिक्षा चोरीचा सपाटा लावला. दरम्यान त्याने कल्याण पश्चिमेतील एका हॉटेलसमोर उभी असलेली दुचाकी लांबवली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अडकला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने या आधीही अनेक वाहनांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.