भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजही हजारो अनुयायांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. महामानवाला वंदन करण्यासाठी भीमसैनिकांची रीघ सुरूच होती.
6 डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन झाला. देशाच्या कानाकोपऱयातून लाखो अनुयायांनी त्या दिवशी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले, पण त्यानंतरही भीमसैनिकांचा चैत्यभूमीवर येण्याचा ओघ सुरूच आहे. आज सकाळपासून हजारोंच्या संख्येने वृद्ध, लहान मुले व तरुणांनी शिस्तीत रांगा लावून बाबासाहेबांना वंदन केले. मुंबईच नाही तर आजूबाजूच्या जिह्यातूनदेखील भीमसैनिक आले होते. आम्हाला 6 डिसेंबरला येता आले नाही त्यामुळे आम्ही आज आलो असे काही अनुयायी म्हणाले, तर 6 डिसेंबर रोजी गावा-खेडयातून, परराज्यातून मोठय़ा संख्येने अनुयायी आले होते. त्यामुळे त्यांना बाबासाहेबांना अभिवादन करताना अडथळा होऊ नये म्हणून आम्ही त्या दिवशी न येता आज आल्याचे मुंबईतील व आजूबाजूच्या परिसरातील भीमसैनिकांनी सांगितले.