कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रश्श्यासह झणझणीत मिसळ आणि गुळाच्या जिलेब्यांची चव आता नालासोपाऱ्यात चाखायला मिळणार आहे. चांगभलं प्रतिष्ठान संचालित छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर – नालासोपारा वसई विरार यांच्या वतीने भव्य कोल्हापूर महोत्वसावाचे आयोजन करण्यात आले आहे. नालासोपाऱ्यात सेंट्रल पार्क मैदान येथे 22 नोव्हेंबरपासून या कोल्हापूर महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
कोल्हापूर महोत्सवामध्ये खाद्यसंस्कृतीसह कुस्ती स्पर्धा, लावण्यांचा कार्यक्रम, लोककलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे महिलांसाठी हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. वसई, नालासोपारा आणि विरारमधील कोल्हापूरकरांना एकत्रित आणण्यासाठी छत्रपती शाहू प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून हे सामाजिक कार्य करत आहे.
छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास बिर्जे, सचिव परशुराम मांगले, खजिनदार परशुराम यादव, कार्याध्यक्ष मारुती संकपाळ, उपाध्यक्ष रामचंद्र हाटोळ, उपसचिव आनंद रक्ताडे, प्रमुख सल्लागार महादेव अर्दाळकर, युवा संघटक आतिष शिखरे व युवा सहसंघटक प्रदीप चौगुले यांनी या महोत्सवासाठी विशेष मेहनत घेतली आहे. या महोत्सवासाठी स्टॉल बुकिंगसाठी तनुजा तोडकर 9967246001, आनंद रक्ताडे – 9920016121 या क्रमांकावर संपर्क करणे.
महोत्सवाची रूपरेषा
22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता शोभायात्रा काढून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. 23 नोव्हेंबर कुस्तीचे आखाडे, पुरस्कार सोहळा, 24 नोव्हेंबर ठसकेबाज लावण्या, 30 नोव्हेंबर कोल्हापुरातील हरहुन्नरी कलाकारांचा सत्कार आणि 1 डिसेंबर लावणी, डान्स स्पर्धा पार पडणार आहेत. 1 डिसेंबरला या महोत्सवाची सांगता होणार आहे.