गुढीपाडव्याला कोकणच्या राजाचा एपीएमसीत ‘झिम्मा’

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा. साडेतीन मुहूतपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर कोकणचा राजा एपीएमसी मार्केटमध्ये अक्षरशः झिम्मा खेळला. देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या 40 हजार 364 पेट्यांची आज एपीएमसी मार्केटमध्ये आवक झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आवक कमी असली तरी यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसच्या पेटीला 2 ते 4 हजार रुपयांचा दर मिळाला.

वातावरणातील बदल आणि मध्यंतरी अचानक वाढलेला थंडीचा जोर याचा यंदाही हापूसला फटका बसला आहे. हापूसचा हंगाम लांबणीवर पडला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत कोकणातील हापूसची आवक 55 ते 60 हजार पेट्यांपर्यंत गेली होती. मात्र यंदा मार्चमध्ये दरदिवशीची आवक ही 30 ते 38 हजार पेट्ट्यांपर्यंत राहिली आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 40 हजार पेट्या मार्केटमध्ये आल्या. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून हापूसची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.