शोभायात्रांनी दुमदुमली मुंबईनगरी! तरुणाईचा उत्साह

गिरगावच्या शोभायात्रेत पाडव्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यात पारंपारिक नऊवारी साडया नेसून, अंबाडयांवर गजरे, अंगावर ठेवणीतले दागिने, नाकात नथी आणि अंगावर शेला परिधान करून शिवसेनेच्या रणरागिणीही  ढोल ताशांच्या तालावर थिरकल्या. मराठमोळ्या वेशभूषेतील नारीशक्तीने मग सेल्फी  काढून हा उत्साहाचा, आनंदाचा क्षण बंदिस्त केल़ा

विविध ठिकाणच्या शोभायात्रांमध्ये मराठी कलाकार सहभागी झाले. गिरगावात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे आदी सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात गुढी उभाली. राज्यपालांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱयांना  गुढीपाडवा व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

चित्ररथाच्या माध्यमातून आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांना अभिवादन करण्यात आले. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला तत्काळ नाना शंकरशेठ यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

नागपूरात सर्वात उंच गुढी

गोदरेज आनंदम सिटी गणेशपेठ येथे   170 फूट उंच गुढी उभारण्यात आली. या सर्वात उंच गुढीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. सकल  मराठा समाज व गायत्री क@टर्स  आणि जनता जनार्दन  ( जन सुरक्षा समिती) यांनी यावर्षी विक्रमी गुढी उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार  सकाळी 9 वाजता  गुढी उभारण्यात आली.

घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. अनेक चाळी, इमारती, टॉवरमध्ये पारंपरिक पद्धतीने गुढी पूजन झाले.

विविध ठिकाणच्या शोभायात्रांमध्ये लहानग्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. चिमुरडयांनी छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी यांची वेशभूषा परिधान करून त्यांना अनोखे अभिवादन केले.

शोभायात्रांमध्ये संस्कृतीचे विविध रंग दिसून आले. अनेक जण ऐतिहासिक, पौराणिक वेशभूषेत सहभागी झाले.

कमरेभोवती रिंग फिरवणे म्हणजे हुला हुपिंग. गिरगावच्या शोभायात्रेत या अनोख्या कला प्रकाराचे सादरीकरण युवतीने करुन उपस्थितांची दाद मिळवली.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक  हिंदू नवर्षाचा शुभारंभ असलेला गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठया उत्साहात साजरा झाला. नववर्षाचे जल्लोषात स्वागत झाले.  गिरगाव, वरळी, प्रभादेवी, दादर, विलेपार्ले, बोरीवली, ठाणे, डोंबिवली येथे निघालेल्या शोभायात्रांनी जल्लोषात भर घातली.  तरुणाईचा उत्साह दांडगा होता. शोभायात्रांमध्ये अभिजात मराठीचा जागर करणाऱ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांचा बोलबाला होता.

ताडदेव येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या शोभायात्रेत विविध मर्दानी खेळ सादर करण्यात आले. 86 वर्षांचे मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे यांनी लाठीकाठी फिरवत सगळ्यांना चकित केले.

जोगेश्वरी येथे शिवसेना नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात निघाली. पारंपरिक वेशभूषेत महिला – पुरुष सहभागी झाले. यावेळी शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर उपस्थित होते.

रविवारची मंगलमय पहाट, चौकाचौकांत रांगोळ्यांचा साजनभी उंच फडकणारे भगवे ध्वज, ढोलपथकांचा ठेका आणि त्यावर ताल धरणारी तरुणाई, फेटेधारी तरुण आणि पारंपरिक साडीतील लावण्य’… हिंदू नववर्ष स्वागताचा असा देखणा सोहळा आज  मुंबई आणि उपनगरांत रंगला. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांनी अवघी मुंबापुरी दुमदुमली. यामध्ये तरुणाई मोठय़ा प्रमाणात सहभागी झाली.

 अभिजात मराठीचा जयघोष

मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात’ दर्जा मिळाला. या पार्श्वभूमीवर शोभायात्रांमध्ये अभिजात मराठीचा जयघोष करणारे अनेक चित्ररथ ठिकठिकाणी पहावयास मिळाले. गिरगावच्या स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या शोभायात्रेत मराठी भाषा विभागाचा अभिजात मराठी भाषेचा चित्ररथ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला दिलेले शब्द, संत साहित्य आणि वारकरी संप्रदायावर आधारित देखावा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावरील चित्ररथ आकर्षण ठरले.