नाग नदीवरील बंधाऱ्यांचे २८ लोखंडी गेट चोरून दादरा नगरच्या भंगारवाल्याला विकले

शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता यावी आणि गुरांना उन्हाळ्यात पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी नाग नदीवर चार ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या लोखंडी गेटवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. पावसाळ्यात नदीला महापूर येत असल्याने हे सर्वच 28 गेट काढून एका शेतात ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी दोन महिन्यांपूर्वी या गेटवर डल्ला मारून ते दादरा नगर हवेलीमधील एका भंगारवाल्याला विकले आहे. या चोरीची तक्रार करून दोन महिने उलटले असले तरी जव्हार पोलिसांनी कोणताही तपास न करता डोळ्यांवर झापडे ओढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तालुक्यातील पिंपळशेत-खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील वडपाडा येथे 2015 साली लघुपाटबंधारे उपविभाग जव्हार यांच्याकडून नाग नदीवर पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चार बंधारे बांधण्यात आले आहेत. हे बंधारे बांधताना दोन पिलरच्या मध्ये लोखंडी गेट तयार करण्यात आले आहे. गेट टाकल्यानंतर झालेला पाणीसाठा नदी-नाल्याच्या बाजूचे शेतकरी विद्युत पंप, डिझेल पंपाद्वारे शेतीसाठी वापरतात. या बंधाऱ्यांमुळेच या भागातील शेतकरी उन्हाळी मिरचीचे पीक घेतात. त्यांच्या गुरांना उन्ह्यात पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध असते. वडपाडा येथील चार बंधाऱ्यांचे 32 लोखंडी गेट पाऊस जास्त पडत असल्यामुळे विलास हिरजा भोये यांच्या शेतात काढून ठेवण्यात आले होते. पाऊस कमी झाल्यानंतर ते पुन्हा टाकण्यात येणार होते, परंतु 8 जुलैच्या रात्री चोरट्यांनी विलास भोये यांच्या शेतातून 28 लोखंडी गेट चोरले व एका पिकअप गाडीमध्ये भरून जवळच असलेल्या केंद्रशासित दादरा नगर हवेली राज्याच्या खानवेल येथील भंगारवाल्यास विकले.

चोरट्यांची नावे दिली तरी कारवाई होईना

गेट चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपळशेत-खरोंडा ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश जाधव यांनी जव्हार पोलीस ठाण्याला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ग्रामस्थांनी संशयित चोरट्यांची नावेदेखील दिली, परंतु आज जवळजवळ दोन महिने उलटूनदेखील जव्हार पोलिसांनी याबाबत कारवाई केलेली नाही. जर वेळीच कारवाई झाली नाही तर खानवेल येथील भंगारवाल्याकडून या लोखंडी गेटची विल्हेवाट लावली जाईल आणि शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे जव्हार पोलिसांनी तातडीने कारवाई करून हे गेट ताब्यात घ्यावेत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.