चोर समजून लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू दक्षिण एक्सप्रेसमधील घटना, चौघांना अटक

मोबाईल चोर समजून धावत्या ट्रेनमध्ये चार प्रवाशांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत शशांक रामसिंग राज या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी नागपूर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. धावत्या ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद ते दिल्ली येथे जाणा-या दक्षिण एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली आहे. दक्षिण एक्सप्रेस ही सेवाग्रामजवळ असताना चोर समजून चार प्रवाशांनी जनरल बोगीत असलेल्या शशांक रामसिंग राज या तरुणाला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तरुण जबर जखमी झाला. जखमी तरुणाची वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी करत आहे.