सामूहिक बलात्कार करून पीडितेची हत्या करणाऱया आरोपीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या घटनेत आरोपीचा सहभाग होता. त्याला जामीन देता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीची जामीन याचिका फेटाळून लावली.
निकलेश पाटील असे या आरोपीचे नाव आहे. 2017मध्ये ही घटना घडली. या प्रकरणातील सहआरोपीला जामीन देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून कारागृहात असल्याने सहआरोपीला जामीन मंजूर झाला आहे. मीही 2017पासून कारागृहात आहे. मलाही जामीन द्यावा, अशी मागणी पाटीलने केली होती. न्या. भारती डांगरे यांच्या एकल पीठाने ही मागणी मान्य केली नाही. दरम्यान, सामूहिक बलात्कार व पुरावे नष्ट करण्यात पाटीलचा सहभाग आहे. तसे पुरावे आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून कारागृहात आहे या मुद्दय़ावर आरोपीला जामीन देता येणार नाही, असे न्या. डांगरे यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
n या प्रकरणात तीन आरोपी आहेत. नीलेश खोब्रागडे, अक्षय वालोदे व निलकेश पाटील अशी या आरोपींची नावे आहेत. निलेश व निलकेश एकमेकांना 2014पासून ओळखत होते. 2017 मध्ये हे दोघे नागपूरहून मुंबईला येत होते. पीडिता निलकेशची मैत्रीण होती. तिलाही मुंबईला जायचे होते. ती पुण्यापासून त्यांच्या सोबत होती. 7 सप्टेंबर 2017 रोजी ते अंबरनाथला आले. तेथे त्यांना अक्षय भेटला. ते चौघे सोबत होते. पीडिता तेथून निघून गेल्याचे निलकेश व अक्षयने निलेशला सांगितले. पीडिता बेपत्ता असल्याचे निलेशला कळाले. पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली निलकेशने दिली. निलेशने या दोघांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.