फेक कॉल होणार ब्लॉक

मोबाईलवर फेक कॉल करून फसवणुकीचे प्रकार घडतात. अगदी परदेशात बसून देशातील मोबाईल ग्राहकांना लक्ष्य केले जाते. अशा फ्रॉड करणाऱया व्यक्तींना पकडणे कठीण असते. मात्र आता असा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय, ज्याद्वारे आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणारे फेक मेसेज आणि कॉल ब्लॉक केले जातील. या प्लॅनच्या अंतर्गत सरकारने दूरसंचार ऑपरेटर्सना इंटरनॅशनल फेक कॉल आणि फेक मेसेज ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. खरं तर हे नंबर परदेशातून डायल केले जातात. असे कॉल आणि मेसेज सरकारच्या रडारवर आहेत. लोकांच्या मोबाईलवर येण्यापूर्वीच हे कॉल व मेसेज ब्लॉक केले जाणार आहेत.

l इंटरनॅशनल फेक कॉल्सद्वारे सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक केली जात आहे. या कॉल्सचा वापर खोटी अटक,  फेडेक्स घोटाळा, कुरीअरमधील ड्रग्ज किंवा मादक पदार्थांसाठी, सरकारी आणि पोलीस अधिकाऱयांची तोतयागिरी करणे, ट्राय किंवा दूरसंचार विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करणे आणि मोबाईल नंबर ब्लॉक करण्याची धमकी देणे इत्यादींसाठी केला जातो, अशा दूरसंचार विभागाकडे तक्रारी आल्या आहेत.

तक्रार कशी नोंदवायची?

फेक कॉलची तक्रार ‘चक्षू’ पोर्टलवर करता येईल. येत्या काळात  ‘चक्षू’साठी अॅप तयार केले जाणार आहे.  जर तुम्हाला फसव्या हेतूने कोणताही कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश आला तर तुम्ही पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. तक्रारीमध्ये कॉल किंवा एसएमएस आल्याची वेळ, तारीख आणि त्यासंबंधीची सर्व माहिती द्यावी लागेल. अशा कॉल किंवा मेसेजचा स्क्रीनशॉटदेखील रेकॉर्ड म्हणून द्यावा लागेल. जर कोणी सायबर गुह्याचा किंवा फसवणुकीचा बळी ठरला असेल तर त्याने ‘चक्षू’ पोर्टलऐवजी भारत सरकारच्या सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर किंवा  www.cybercrime.gov.in  या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी.