सरकारने मजुरांनाही फसवले; सहा महिन्यांपासून रोहयोची फुटकी कवडीही नाही

शहापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सुमारे 25 हजार मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने या मजुरांनाही फसवल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मजुरीचा एक रुपयाही मिळालेला नाही. त्यांची 64 लाख 73 हजार रुपयांची मजुरी थकल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणे अवघड झाले आहे. मजुरीसाठी शेकडो मजूर दररोज रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात येत आहेत. तिथे त्यांना निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून पुन्हा पाठवले जात आहे. रोजगार हमी योजनेची मजुरी मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेकडो मजुरांनी आता रोजीरोटीच्या शोधात स्थलांतर सुरू केले आहे.

रस्ते तयार करणे, विहीर काढणे, तलावांचे गाळ काढणे, शौच खड्डे काढणे, घरकुल बांधकाम, भातशेती दुरुस्ती करणे, फळ बाग व वृक्ष लागवड करणे, बांबू लागवड करणे, संरक्षण भिंत बांधणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामे ग्रामपंचायतमार्फत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जात आहेत. या कामावर स्थानिक लोकांना मजूर म्हणून काम उपलब्ध करून दिले जात आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर ही कामे करताना शासकीय मजूर म्हणून मंजूर कुटुंबांना जॉब कार्डदेखील देण्यात आली आहेत. हीच कामे केलेल्या तालुक्यातील सुमारे 25 हजार मजुरांना गेल्या पाच महिन्यांपासून मजुरी देण्यात आलेली नाही.

■ शासकीय दराप्रमाणे प्रत्येक मजुरास 297 रुपये, अशी अल्प मजुरी दिली जात आहे. ही मजुरी अगदी कमी तर आहेच परंतु मजुरीचे पैसेदेखील वेळेवर हातात मिळत नाहीत, अशी भयानक परिस्थिती आहे.
■ शहापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांवर मजुरीचे काम करूनही गेल्या पाच महिन्यांपासून जॉब कार्डधारक मजुरांना आपल्या मजूरीची रक्कम मिळालेली नाही. ऑक्टोंबर महिन्यापासून मजुरांचे पैसे दिले गेले नाहीत.
■ मजुरीचे पैसे मिळत नसल्याने तालुक्यातील वासिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, कसारा परिसरातील आदिवासींनी रोजगाराच्या शोधात आपल्या पोराबाळांसह शहराची वाट घरली आहे.

पत्रव्यवहार सुरू आहे

रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांचे पैसे मिळाले नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे. यामुळे मजुरांचे वेतन थकीत आहे. निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. सर्वच मजुरांना त्यांची मजुरी लवकर मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अनंतालपे यांनी व्यक्त केली आहे.