दिमाखदार समारोप सोहळ्याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे सूप वाजले. यंदाच्या या सर्वोच्च क्रीडा महोत्सवात जागतिक क्रीडा महासत्ता असलेल्या अमेरिका व चीनमध्ये ‘नंबर वन’च्या सिंहासनासाठी चांगलीच रस्सीखेच बघायला मिळाली. अमेरिकेने अखेरच्या क्षणी बॉस्केटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून कसेबसे ‘नंबर वन’चे सिंहासन राखले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिका व चीनच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. मात्र, यजमान फ्रान्सचा 22 वर्षीय जलतरणपटू लिओन मर्चंड याने सर्वाधिक 4 सुवर्णपदके जिंकून खऱ्या अर्थाने यंदाची 33वी ऑलिम्पिक स्पर्धा गाजविली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 206 देश आणि ऑलिम्पिक कमिटी असे 207 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी फक्त 63 देशांना सुवर्णपदक जिंकता आले. यात 19 देशांनी चार किंवा त्याहून अधिक सुवर्णपदके पटकावली. मात्र, फ्रान्सच्या लिओन मर्चंड या पुरुष जलतरणपटूने एकट्याने 4 सुवर्ण व एक कांस्य अशी एकूण 5 पदके जिंकून इतिहास घडविला. याचाच अर्थ, तब्बल 187 देश व ऑलिम्पिक कमिटी यांना जे करता आलं नाही, ते एकट्या लिओन मर्चंडनं करून दाखवलं. कारण यातील एकाही देशाला चार सुवर्णपदके जिंकता आली नाहीत. यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. हिंदुस्थानचे 117 खेळाडूंचे पथक पॅरिस ऑलिम्पिकच्या स्वारीवर गेले होते. मात्र, 140 कोटी नागरिकांचा देश असलेल्या हिंदुस्थानच्या सुवर्णपदकाची पाटी कोरीच राहिली. एक रौप्य व पाच कांस्य अशी एकूण 6 पदकांची कमाई करीत हा देश ऑलिम्पिकच्या पदकतक्त्यात 71व्या स्थानी राहिला.
लिओनने मोडला 48 वर्षांपूर्वीचा विक्रम
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सचा जलतरणपटू लिओन मर्चंड याने घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने 4 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. ऑलिम्पिकमध्ये तीनहून अधिक सुवर्णपदकं जिंकणारा तो पहिलाच जलतरणपटू ठरला हे विशेष! त्यामुळे आता या 22 वर्षीय लिओन मर्चंडची तुलना ऑस्ट्रेलियाचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सशी केली जात आहे. लिओन मर्चंडने अवघ्या 2 तासांच्या कालावधीत 2 सुवर्णपदके जिंकून एकाच दिवशी दोन सुवर्णपदकं जिंकण्याचा 48 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. याआधी 1976च्या ऑलिम्पिकमध्ये असा विक्रम झाला होता. ऑलिम्पिकच्या इतिहासात 3-3 सुवर्णपदके जिंकणारे अनेक खेळाडू आहेत. यामध्ये यूएसएची टोरी हस्के, सिमोन बिल्स आणि गॅबी थॉमस, ऑस्ट्रेलियाची मॉली ओ’कॅलाघन यांचा समावेश आहे.
फेल्प्सचा विक्रम अबाधित
एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक वैयक्तिक सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सच्या नावावर आहे. फेल्प्सने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकूण 8 वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली होती. एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम दोन खेळाडूंच्या नावावर आहे. त्यापैकी पहिला रशियन जिम्नॅस्ट अॅथलीट अलेक्झांडर डेटियाटिन हा आहे. त्याने 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य अशी 8 पदके जिंकली होती. त्यानंतर मायकेल फेल्प्सने हा पराक्रम दोनदा केला. त्याने 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य अशी 8 पदके जिंकली होती. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने 8 सुवर्णपदकांची लयलूट करीत महापराक्रम केला. आता फ्रान्सच्या लिओन मर्चंडकडे फेल्प्सचा वारसदार म्हणून बघितले जात आहे. आगामी ऑलिम्पिकमध्ये तो फेल्प्सच्या पंगतीत जाऊन बसतो का नाही ते बघावे लागेल.