आपली मऱ्हाटमोळी खो खो आता कात टाकून पुढे जात आहे. हिंदुस्थानी खो खो महासंघाने (ख्ख्इघ्) पहिला वर्ल्ड कप 13 ते 19 जानेवारी या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित केला आहे. या स्पर्धेसाठी ‘हिंदी सिनेसृष्टीचा सुलतान’ सलमान खान याला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. ही घोषणा जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरात करण्यात आली.
सलमान खान पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी खूप उत्साही आहे. त्याने या खेळाची व आपली नाळ जुळली असल्याचे सांगितले. तसेच खो खोसारखा आपल्या मातीतील खेळ जगभर पसरत असल्याचे पाहून आपल्याला खूप आनंद झाल्याचेही सांगितले.
‘मी पहिल्या खो खो वर्ल्ड कप 2025 चा भाग आहे याचा मला अभिमान वाटतो! आपण सगळ्य़ांनी एकदा तरी खो खो खेळलेला असेलच. त्यामुळे ही फक्त एक स्पर्धा नसून या स्पर्धेमुळे हिंदुस्थानच्या महाराष्ट्राच्या मातीतील खेळाला, आत्म्याला आणि सामर्थ्याला दिलेला सन्मान आहे,’ असे सलमान खान याने आपल्या संदेशात सांगितले. ‘हा एक चपळ खेळ असून, तो आता जगभरात लोकप्रिय होत आहे. चला, एकत्र येऊ आणि जागतिक स्तरावर खो खोचा उत्सव साजरा करू,’ असे तो म्हणाला.
या खो खो वर्ल्ड कपमध्ये 24 देशांचे संघ सहभागी होणार असून ही स्पर्धा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. विविध देशांचे प्रतिनिधी येथे आले असून त्यांच्यासाठी प्रात्यक्षिक सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख खेळाडू प्रतीक वाईकर, आदित्य गणपुले, रामजी काश्यप, दिलीप खांडवी, सुयश गरगटे, गौतम एम.के., सचिन भार्गव, विशाल, अरुण गुणकी, प्रियांका इंगळे, मुस्कान, मीनू, नसरीन, रेश्मा राठोड आणि निर्मला पांडे आदी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा जगभरातील प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरणार आहे. हिंदुस्थानी खो खो महासंघ पुरुष आणि महिला खेळाडूंना समान संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यामुळे दोन्ही गटांसाठी समान व्यासपीठ तयार केले आहे.