राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला रत्नागिरीत सुरुवात; स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी झाले आहेत.

अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी राजकिरण दळी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे उपसंचालक नरेंद्र तायडे तसेच मान्यवर परीक्षक उपस्थित होते. राज्यगीताने उद्घाटन समारंभ सुरू झाला. नंतर मान्यवरांनी नटराज पूजन, दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढविला. सर्व मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन समारंभास तसेच बालनाट्य पाहण्यासाठी रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.