लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्या, मतदान केंद्रे याबाबत 25 जूनपासून पूर्वतयारीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह झारखंड, हरियाणा व जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच या सर्वच राज्यांना निवडणुकीची आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
25 जूनपासून मतदार नोंदणी
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, येत्या 25 जूनपासून मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 1 जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून त्यापूर्वी पात्र असलेल्यांना मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची घोषणा
विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.