तवा आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे काम लटकले; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून इमारतीचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. आश्रमशाळेत पाचवी ते बारावीपर्यंत 577 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ठेकेदाराने नवीन इमारतीचे काम रखडवल्याने मुलांना शिकवण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे एका खोलीत दोन वर्ग घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

ठेकेदार दाद देईना

मुख्याध्यापक संतोष सगर यांनी शाळा इमारतीचे काम रखडवल्याबद्दल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांच्याकडे लेखी स्वरूपात कैफियत मांडली आहे. पालकांनीदेखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी इमारतीचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे. मात्र आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा ठेकेदारावर अंकुश नसल्याने इमारत अर्धवट आहे.

तवा आश्रमशाळेसाठी तीन मजली इमारत बांधली जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी या इमारतीच्या बांधकामास प्रारंभ झाला. पहिल्या ठेकेदाराने काही तांत्रिक अडचणी आणि दिरंगाईमुळे काम अर्धवट सोडले. परिणामी हे कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आला. नव्या ठेकेदाराने काही महिन्यांपूर्वी पुन्हा काम सुरू केले होते पण अवघ्या दोन महिन्यांतच त्यानेही काम करणे थांबवले आहे. शाळेच्या इमारतीचे काम अर्धवट असल्याने शाळा व्यवस्थापनावर ताण येत असून एका वर्गात दोन वर्ग भरवावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आणि शिकण्यासाठी जागा अपुरी पडते. शिक्षकांनाही शिकवताना अडचण येत आहे. वर्गात गोंधळ वाढत असल्याने शिकवण्यावर परिणाम होत आहे. या आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय असल्याने येथे 11 वी आणि 12 वी कला व वाणिज्य शाखांचे वर्ग आहेत. विद्यार्थ्यांना पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.