धनगर समाज मिंध्यांवर संतापला; यशवंत सेनेने पाठिंबा काढला

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्याशिवाय समाजाचे प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयश आल्याचा ठपका ठेवत यशवंत सेनेने मिंधे गटाला दिलेला पाठिंबा अखेर काढून घेतला आहे. यशवंत सेनेचे प्रमुख माधव गडदे यांनी स्वतः आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज संतापला असून यापुढे जो पक्ष समाजाला प्रतिनिधीत्व देईल त्याच पक्षाला पाठिंबा देण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करणार असल्याचे गडदे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रात सर्वत्र धनगर आरक्षणाचा विषय पेटला असून वारंवार आंदोलने करूनदेखील मुख्यमंत्र्यांनी कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही. आरक्षणासह समाजबांधवांचे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. म्हणूनच अशा बेफिकीर व धोकेबाज मिंध्यांना यापुढे कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नसल्याचेही पत्रकार परिषदेत यशवंत सेनेचे माधव गडदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून न्याय मिळत नसेल तर आम्ही त्यांच्याबरोबर का रहायचे, यापुढील भूमिका लवकरच जाहीर करू असेही त्यांनी सांगितले.

आता त्यांची अधोगती सुरू

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आम्हाला वेळ देत नाहीत, असा आरोप करीत मिंधे बाहेर पडले आणि त्यांनी दगाफटका करून भाजपशी संधान साधत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. पण त्यांच्या आजूबाजूची माणसे कुणाला भेटू देत नाहीत. फक्त बगलबच्च्यांच्या मर्जीतील माणसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचू शकतात. मिंधे गटाची आता अधोगती सुरू झाल्याचेच हे लक्षण आहे असेही गडदे यांनी स्पष्ट केले.