माथेरान जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असले तरी गेल्या अडीच वर्षांत मिंधे सरकारने माथेरान गिरीस्थान नगर परिषदेला निधीच्या रूपाने फुटकी कवडीही न दिल्यामुळे पर्यटनस्थळाचा विकास रखडला आहे. गेली तीन वर्षे मुख्याधिकारीच प्रशासकीय कारभार पाहात आहेत. मात्र मिंधे गटाच्या मंत्री आणि आमदारांच्या हस्तक्षेपामुळे गेल्या अडीच वर्षांत माथेरानला तीन मुख्याधिकारी झाले. त्यामुळे माथेरानच्या विकासाला खीळ बसली आहे.
2019 ला महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माथेरानला भरभरून निधी दिला. माथेरानच्या पर्यटन वाढीस कारणीभूत ठरणारी अनेक मूलभूत विकासकामे सुरू झाली. यामध्ये हुतात्मा वीर कोतवाल क्रीडा संकुल आणि प्रेक्षणीय स्थळांचा समावेश होता. मात्र गद्दारी करून सत्तेवर आलेल्या मिंधे सरकारने गेल्या अडीच वर्षांपासून लोकहिताची कामे थांबवली आहेत. व्यक्तिगत स्वार्थापोटी मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी हस्तक्षेप करून विकासकामांना खो घातला आहे. सुरू असलेली कामे थांबवल्यामुळे ठेकेदारांचे पैसे मिळणे मुश्किल झाले आहे. विकसित प्रेक्षणीय स्थळांचे साफसफाई करण्याचे गांभीर्यही प्रशासनाला नाही. प्रशासकीय अधिकारी यांना मर्यादित अधिकार व सत्तेतील मंत्री, आमदार यांचा दबाव असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सत्ता काळातील अनेक महत्त्वाचे ठराव प्रलंबित आहेत. गेल्या तीन वर्षांपासून नगर परिषदेत प्रत्यक्ष निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेला वाली कोण, हा प्रश्न आहे.
अडीच कोटींचा निधी परस्पर वळवला
महाविकास आघाडीच्या सत्ता काळात रस्ते, गटारे, पथदिवे यांसह प्रेक्षणीय स्थळांच्या विकासासाठी अडीच कोटींचा निधी दिला. मात्र गेल्या अडीच वर्षांत मिंर्धेच्या आमदारांनी यातील काही निधी तालुक्यातील इतर कामांसाठी परस्पर वळवला. त्यामुळे माथेरानच्या चार प्रेक्षणीय स्थळांची कामे अर्धवट आहेत. पर्यटनस्थळांचा विकास नसल्याने पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
अडीच वर्षात एकाही पर्यटनस्थळाचे सुशोभीकरण नाही.
आमदारांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी माथेरानचा विकास रोखला.
माथेरानच्या भूमिपुत्राला बेरोजगार करण्याचे पाप मिंधेंनी केले.
मंत्री, आमदारांच्या हस्तक्षेपामुळे नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तणावात.
सात प्रेक्षणीय स्थळांची कामे ठप्प
2020 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 10 प्रेक्षणीय स्थळे विकसित करण्याच्या प्रस्तावापैकी पहिल्या टप्प्यात 7 पॉईंट विकसित करण्यासाठी मान्यता मिळाली होती. यानुसार अलेक्झांडर पॉईंट, लिटिल चौक पॉईंट, डेंजर पाथ, लमले सीट, सिलिया पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट यांचा समावेश होता. याशिवाय किंग जॉर्ज पॉईंट, एडवर्ड पॉईंट, कोरोनेशन पॉईंट, मारिनुक पॉईंट यांच्या विकासासाठीही निधी दिला. मात्र मिंधेची सत्ता येताच ही सर्व कामे थांबवली आहेत.