कश्मीर खोऱ्यातील गावात दहशतवादाचा काळाकभिन्न अंधार…

>> प्रभा कुडके

22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या कश्मीरच्या खोऱ्यात गूढ अनामिक शांतता पसरली आहे. ही शांतता कश्मीरच्या सौंदर्याचीही चिरफाड करेल इतकी भयावह आहे. कश्मीर खोऱ्यातील प्रत्येक गाव सध्या स्वतःच्या अस्तित्वाशी झुंजताना दिसत आहे. असंच एक कश्मीरमधलं गाव म्हणजे बालटाल. हिंदू धर्मीयांसाठी बालटाल हे गाव फार विशेष महत्त्वाचं आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या याच गावातून अमरनाथ यात्रेची सुरुवात होते आणि इथेच बेस कॅम्प वसतो. पर्यटक नसल्यामुळे कश्मीर आर्थिकदृष्टय़ा खंगलं आहे. प्रत्येक कश्मिरीच्या डोळ्यात आर्त अगतिकता आहे.

कश्मीरातून सुरू होत असलेली अमरनाथ यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्याआधी किमान दोन महिने बालटाल हे गाव यात्रेकरूंच्या सेवेसाठी सज्ज झालेले असते. खेचरांची – घोडय़ांची काळजी घेणं, लाकडी पालख्या बनवणं अशी अनेक कामं ही गावात सुरू असतात. भक्तांना चढ चढण्यासाठी लागणारे बांबू तोडून आणणं, ते तासणं ही अशी अनेक छोटी-मोठी कामं गावात सुरू असतात. परंतु यंदा मात्र नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने अमरनाथ यात्रेला भक्तांची संख्या कमी होईल की काय, हीच चिंता इथल्या गावकऱ्यांना सतावत आहे.

बालटालला भेट दिल्यावर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर केवळ दहशतवादाच्या पाऊलखुणांचं भय दिसून येत होतं. बालटाल गावात आत शिरताच अनेक खेचरं आणि घोडे दिसले. या गावातील प्रत्येक घरात एकतरी घोडा किंवा खेचर हे दिसतंच. गावातील प्रत्येक घरासाठी हेच प्राणी उपजीविकेचे साधन आहे.

अमरनाथ यात्रेमध्ये बालटाल गावातील प्रत्येक घरातून कर्ता पुरुष हा सक्रियरित्या सहभागी होत असतो. त्याच्या जोडीला घरातील मुलंही सहभागी होतात. यात्रेमध्ये काठय़ा विकणं असो, पाण्याच्या बाटल्या विकणं असो किंवा गमबूट भाडय़ाने देणं असो. या गावातील प्रत्येक व्यक्ती ही अमरनाथ यात्रेसोबत काही ना काही निमित्ताने जोडलेली असते. परंतु दहशतवादी हल्ल्यामुळे दहशतीची काळी पावले अमरनाथ यात्रेवर उमटतील या भीतीने इथला प्रत्येक गावकरी ग्रासला आहे. यंदा अमरनाथ यात्रेला भाविक येतील की नाही याची चिंता सध्या बालटाल गावातील प्रत्येक रहिवाशाला सतावत आहे. अमराथ यात्रेत भाविक आले नाहीत तर पुढचा उदरनिर्वाह कसा होणार याच चिंतेत गावकरी दिसताहेत.

वर्षातून एकदा येणाऱ्या अमरनाथ यात्रेवर या गावातील प्रत्येक घराचं भवितव्य ठरतं. रोटी-बेटी व्यवहार यात्रेतून येणाऱ्या पैशातूनच होतात. नवीन घर बांधणं, जनावर घेणं हे सर्वकाही अमरनाथ यात्रेतील कमाईमधूनच या गावातील लोक करत असल्यामुळे सध्या मात्र गावावर निराशेचं काळं मळभ दाटून आलेलं दिसलं.

अमरनाथ यात्रेला नेहमीपेक्षा कमी गर्दी होईल असा अंदाज इथली जुनीजाणती माणसं लावत आहेत. 70 वर्षांचे मोईन वाणी म्हणतात, बाबा बर्फानीही अब कुछ करेंगे… सर्व चांगलं सुरू असताना अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्याने कश्मीर खोऱ्यातील प्रत्येक गाव एका भयाण वास्तवाशी झुंज देत आहे. हे भयाण वास्तव रोजच्या जगण्याशी आणि पोटाशी निगडित असल्यामुळे भविष्य पुन्हा एकदा अंधकारमय होणार अशीच भीती बालटालवासीयांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

युसूफ म्हणाला…अब सब खत्म हो गया!

गावातील एका घरात डोकावल्यावर युसूफ वाणी नावाचा एक 22 वर्षांचा युवक बाहेर आला. युसूफच्या घरातील गेल्या चार पिढय़ा अमरनाथ यात्रेसाठी पालखी वाहण्याचं काम करतात. यंदा मात्र सर्वच संपलं असं युसूफ म्हणाला. इस साल कोई आएगा नहीं… अब सब खत्म हो गया, असं बोलून तो आत निघून गेला.