पाडकामाचा खर्च जागामालकांकडून वसूल करणार, महापालिका चढवणार सातबाऱ्यावर बोजा

bulldozer

कुदळवाडी, चिखली भागातील अनधिकृत गोदामे, भंगार दुकानांसह लघुउद्योगांवर सुरू असलेल्या पाडापाडीचा खर्च संबंधित जागामालकांकडून वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कारवाईत आत्तापर्यंत तब्बल 850 एकरपैकी 473 एकर क्षेत्रफळावरील बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा खर्चाचा संबंधित जागामालकांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविण्यात येणार आहे. या कारवाईसाठी अंदाजे 1 कोटींचा खर्च येण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली, कुदळवाडीतील पाच हजारांवर भंगार दुकाने आणि गोदामांवर मागील सहा दिवसांपासून सरसकट अतिक्रमण हटाव कारवाई सुरू आहे. ही कारवाई रविवार (दि.16) पर्यंत सुरूच राहणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या या कारवाईत 2 हजार 845 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या कारवाईसाठी महापालिकेच्यावतीने 46 पोकलेन, 8 जेसीबी, 1 क्रेन, 4 कटर या यंत्रसामग्रीसह पोलीस, इतर मनुष्यबळ, जेवण, साहित्य यावर अंदाजे 1 कोटीचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तो जागामालकांकडून वसूल करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वतीने अनधिकृत व्यावसायिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये अनेक व्यावसायिकांकडे अग्निशमन दाखला, उद्योग धंदा परवाना, प्रदूषण नियंत्रण महामंडळाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. तसेच तळवडेतील स्पार्कल फायर कॅण्डल कारखान्याच्या आगीत 14 महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने अनधिकृत गोदामांच्या कारवाईकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली.

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला मूलभूत सुविधा पुरविताना दमछाक होऊ लागली आहे. अनधिकृत बांधकामांना कोणताही थारा देऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. वाकड भागातील दत्त मंदिर परिसरात अतिक्रमणाची मोठी कारवाई केली. कुदळवाडी, चिखलीतील कारवाईसाठी कोणताही राजकीय दबाव नाही. सरसकट कारवाई केली जात आहे. उद्योजकांच्या कोणत्याही मशिनरीला इजा पोहचू दिली नाही. साहित्य काढण्यासाठी व्यावसायिकांना पुरेसा वेळ दिला होता. तसेच शहर अतिक्रमणमुक्त करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

पुन्हा अतिक्रमण झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

■ कुदळवाडी परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी बीट निरीक्षक, क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे पथक नेमले जाणार आहे. हे पथक परिसरात गस्त घालेल. त्यामुळे अतिक्रमण होणार नाही. त्यानंतरही अतिक्रमण झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी दिला आहे.

जागामालकांनी साहित्य न उचलल्यास नोटीस

■ महापालिकेच्या मार्फत पाडकामाची कार्यवाही केल्यानंतर जागामालकांनी पत्राशेडसह त्यांचे सर्व साहित्य दुसरीकडे उचलून घेऊन जावे. साहित्य जागेवर ठेवल्यास आगीची घटना घडू शकते. साहित्य न हटविल्यास जागामालकांना नोटीस देण्यात येणार आहे.